Wednesday, February 19, 2025
Homeनगर‘सार्वमत’चे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

‘सार्वमत’चे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

आपला वाचकप्रिय ‘सार्वमत’ वाटचालीची 49 वर्षे पूर्ण करत आज सुवर्णमहोत्सवी वर्षात दाखल झाला. पाच दशकांचा हा प्रवास मोठा टप्पा ठरतो. श्रीरामपूरसारख्या तालुक्याच्या शहरातून एका प्रादेशिक वर्तमानपत्र समूहाने दैनिकाची मुहूर्तमेढ रोवणे, हेच मुळात एक धाडस होते. तो काळ देशात आणि जिल्ह्यातही धकाधकीचा, सामाजिक घुसळणीचा आणि स्थित्यंतराचा होता. नव्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांना धुमारे फुटत होती. स्वातंत्र्यांची पंचविशी ओलांडल्यानंतर नवं उभारणीत झोकून देण्यासाठी सज्ज झालेल्या पिढीचा तो काळ होता. याच काळात ‘सार्वमत’ची सुरूवात झाली. आज आपण तांत्रिकदृष्ट्या अग्रेसर झालो, माहिती अदान-प्रदानाचा वेग वाढला. 50 वर्षापूर्वीचे चित्र असे नव्हते. ‘सार्वमत’समोर अनेक आव्हाने होती. ती तांत्रिक होती, कौशल्याची होती आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाचीही! चळवळीचा हा धाडसी जिल्हा ताकदीने ‘सार्वमत’च्या पाठीशी उभा राहिला.

‘आपला सार्वमत’ ही जनमानसात 5 दशकांपूर्वी रुजलेली भावना आजही तितकीच तीव्र आहे. मानवी समुहाला उन्नत करण्यासाठी दिशा दाखवणे आणि त्यातून आपणही शिकत राहणे, ही प्रक्रीया वृत्तपत्र म्हणून आजही त्याच तीव्रतेने जोपासत आहोत. सोपी भाषा, सहज संवाद आणि कोणाचीही भीड न बाळगता प्रश्नांची थेट उकल हे ‘सार्वमत’च्या वाटचालीतील ठळक वैशिष्ट्य! ‘सार्वमत’च्या पत्रकारितेस धाडस, धडाडी, प्रभाव, जरब अशा विशेषणांनी वाचक गौरवितात. हे खरे असले तरी आम्ही यास कर्त्यव्यच मानतो. धाडस आणि धडाडीमागे असलेले बळ हे जनसामान्य आणि वाचकांच्या पाठबळाचे आहे, हे आम्ही आवर्जून नमूद करू इच्छितो. तसे नसते तर 5 दशकांत ज्या कठोरपणे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सिंचन, कृषी, शैक्षणिक सुधारणांसाठी भूमिका घेतली, ते शक्य झाले नसते. 5 दशकांच्या काळात ‘सार्वमत’ने हाताळलेल्या प्रश्नांवर नजर टाकली तरी वाचक आणि जनतेच्या सहभागातून रचनात्मक काम कसे उभारता येते, याची जाणीव आम्हास उत्साहित करते.

- Advertisement -

खंडकरी शेतकर्‍यांचा लढा, अकारी पडित शेतकर्‍यांचे प्रश्न, पश्चिमेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी, कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांसाठी पाणी राखीव ठेवण्याची पहिली मागणी अशा विषयांची मालिका मोठी आहे. मात्र येथील मातीच्या प्रश्नांशी घट्ट नाळ हाच आजवर हाताळलेल्या प्रश्नांचा समान धागा! श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची गरज दाखवून देण्याचे कामही ‘सार्वमत’ने केले. सहकार क्षेत्रातील यश साजरे करण्यासोबत चुकांवर बोट ठेवण्याचे धाडसही ‘सार्वमत’ सातत्याने करतो. मुळात सहकार पट्ट्यातील संवादाचे सशक्त माध्यम म्हणून आजही ‘सार्वमत’कडे पाहिले जाते. सिंचनाच्या जाणीवा जागृत करण्यापासून ऊस दर मागणीचा आवाज बुलंद करण्याचे कार्य करत राहिलो. शेतकरी-कामगारांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब ‘सार्वमत’मधून आजही त्याच ठळकपणे उमटत आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला बळ देण्याचे कर्तव्य आम्ही पाळत राहू, हे पहिला अंक काढताना बाळगलेले स्वप्न आजही जपत आहोत. रौप्यमहोत्सव साजरा करताना 25 वर्षांपूर्वी आम्ही तांत्रिक अंगाने प्रगतीचे पाऊल टाकले होते. बहुरंगी छपाईपासून डिजिटल जगात ठळक स्थान निर्माण करण्यापर्यंत अनेक बदल आम्ही मागील अडीच दशकांत अनुभवले. आज काळ झपाट्याने बदलला. समाजातील प्रश्नही बदलले. जुन्या प्रश्नांची जागा नव्या प्रश्नांनी घेतली. आजही अनेक आव्हांनाचा सामना करत समाजासाठी निर्भेळ पत्रकारितेचे व्रत आम्ही जोपासत आहोत. सोशलक्रांतीच्या पुरात समाजाला जमिनीवरील वास्तवाचे भान करून देण्याचे काम करत आहोत. गेल्या 5 दशकांत अनेक सुवर्णक्षणांचा साक्षीदार ठरलेला ‘सार्वमत’ आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी त्याच ताकदीने कार्यरत राहील, याची आम्ही ग्वाही देतो!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या