Sunday, May 3, 2026
Homeनगरसार्वमतने केवळ बातम्या नव्हे तर विचार आणि दिशा देण्याचे काम केले

सार्वमतने केवळ बातम्या नव्हे तर विचार आणि दिशा देण्याचे काम केले

सहकार मंथन परिषदेत जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखेंचे गौरवोद्गार || आ. काळे, कोयटे, विवेक कोल्हेंकडून दैनिक सार्वमतचे कौतुक

कोपरगाव | Kopargav

‘सहकार मंथन’ परिषद ही केवळ सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवाचा भाग नाही, तर सहकार क्षेत्रातील चर्चा आणि चिंतनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. सार्वमतने केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर विचार दिले, दिशा दिली, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढतानाच, सार्वमत हे केवळ वृत्तपत्र नाही, तर जिल्ह्याचे सामाजिक दर्पण आहे. सार्वमत सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. पुढील काळातही हे वृत्तपत्र सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रात मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून गौरवाने ओळखले जाणारे आणि गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे लोकशक्तीची भूमिका निभावणारे दैनिक सार्वमत यंदा आपल्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक टप्प्याचा भव्य शुभारंभ काल गुरूवारी कोपरगाव येथील कृष्णाई बँकेट सभागृहात आयोजित सहकार मंथन परिषद आणि विशेषांक प्रकाशन सोहळ्याद्वारे झाला. यावेळी ना. विखे पाटील बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर आमदार आशुतोष काळे, आमदार विठ्ठलराव लंघे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विक्रम सारडा, सार्वमतचे संपादक अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. विखे पाटील पुढे म्हणाले, 1976 मध्ये श्रीरामपूर येथे सुरू झालेला हा प्रवास आज पन्नास वर्षे पूर्ण करत आहे, हे केवळ ऐतिहासिकच नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपल्याचे द्योतक आहे. छापील माध्यमांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असून, आता डिजिटल माध्यमांचा काळ आहे. न्यूयॉर्क टाइम्ससारखे आघाडीचे वृत्तपत्र देखील पूर्णपणे डिजिटल झाल्याचे आपण पाहतो. अशा काळात सार्वमतसारख्या वृत्तपत्राने जनतेच्या मनात विश्वास टिकवून ठेवला, ही कौतुकास्पद बाब आहे.

सहकार क्षेत्रातील बदलांवर बोलताना ते म्हणाले, कधीकाळी राज्यात अनेक सहकारी सूतगिरण्या, दूध संघ, पतसंस्था मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. पण आज या संस्था बुडीत स्थितीत गेल्या आहेत. त्यामागे काही राजकीय हस्तक्षेप, व्यवस्थापनातील त्रुटी आणि काळाच्या ओघात आलेले बदल जबाबदार आहेत. आज भारत सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून या क्षेत्राला नवीन दिशा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आयकर सवलती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, आणि प्राथमिक सहकारी संस्था दीडशेहून अधिक व्यवसाय करू शकतील, असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे.

राज्यातील अनेक सहकारी पतसंस्था उत्तम कार्य करीत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करत आहेत. काकासाहेब कोयटे, सुरेश बाबळे यांचे नेतृत्व प्रेरणादायक आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, उद्योगवाढ यासाठी पतसंस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी स्वतः पतसंस्थांबाबतचा विषय माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जींकडे मांडला होता. अनेकवेळा या विषयासाठी मी पाठपुरावा केला आहे. भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास सहकारी पतसंस्था अधिक सक्षम होतील. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये झालेल्या बदलामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका आता थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. यामुळे पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नाही, तर ही मानवी विकासाची शक्तिशाली संकल्पना आहे. वसंतदादा पाटील, वैकुंठ मेहता, डॉ. धनंजय गाडगीळ, यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राने अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले. गुजरातमधील अमूलसारखा मॉडेल, इफको, कृभको या संस्थांचे योगदान भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात मोलाचे आहे. सहकार विद्यापीठ सुरू होणे ही देखील मोठी क्रांती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ना. विखे पाटील यांचा सत्कार सार्वमत-देशदूतचे वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विक्रमा सारडा यांनी, आ. आशुतोष काळे आणि आ.विठ्ठलराव लंघे यांचा सत्कार संपादक अनंत पाटील यांनी, विवेक कोल्हे यांचा सत्कार दैनिक सार्वमत-देशदूतचे संचालक तथा सीईओ सुनील ठाकूर यांनी तर काका कोयटे यांचा सत्कार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी केला.

दैनिक सार्वमत हे सामान्य माणसाचा आवाज- आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दैनिक सार्वमत हे केवळ एक वृत्तपत्र नसून, सामान्य माणसाचा आवाज आहे. एखादी ग्रामपंचायतीची बातमी असो की एका छोट्याशा सहकारी संस्थेचा उपक्रम, सार्वमत प्रत्येक बातमीला महत्त्व देत आले आहे. सार्वमत हे एकमेव वृत्तपत्र आहे जे सामान्य कार्यकर्त्याच्या लहानशा कामगिरीलाही महत्त्व देऊन समाजात त्याची दखल घेतं. त्यामुळे या वृत्तपत्राशी जनतेचा अतूट भावनिक बंध तयार झालेला आहे, असे प्रतिपादन कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोश काळे यांनी केले. दैनिक सार्वमत च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत कोपरगाव येथील कृष्णाई बँकेट सभागृहात आयोजित सहकार मंथन परिषद आणि विशेषांक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी स्व. नामदेवराव परजणे दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पतसंस्था फेडरेशनचे सुरेश वाबळे, वासुदेव काळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, युवा नेते विवेक परजणे, राजेंद्र जाधव, केशव भवर, रवींद्र झावरे, डॉ. हिरालाल महानुभाव, भास्करराव खंडागळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आ. काळे पुढे म्हणाले, या परिषदेमधून सहकारावर मंथन करणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त करुन आ. काळे म्हणाले, प्रवरा साखर कारखान्याच्या स्थापनेपासून आपल्या जिल्ह्याने सहकारात क्रांती घडवली आहे. स्व. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठबाई मेहता यांनी या जिल्ह्यातून देशाला सहकाराचे बाळकडू दिले.

जिल्ह्यात साखर कारखाने, पतसंस्था, बँका, दूध संघ, कृषी प्रक्रिया संस्था अशा अनेक सहकारी संस्था गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने कार्यरत आहेत. सहकाराचा पाया मजबूत असल्यामुळे या संस्था टिकून आहेत आणि इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा देत आहेत. सार्वमतने या वाटचालीचा सातत्याने आढावा घेतला, हे विशेष महत्त्वाचे आहे. सार्वमत वृत्तपत्राचा पन्नास वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, याची जाणीव करून देताना आ. काळे म्हणाले, या पेपरची सुरुवात अशा काळात झाली, जेव्हा माध्यमांची परिस्थिती आज इतकी सुलभ नव्हती. त्या वेळी अनेक अडचणींवर मात करत सार्वमतने ग्रामीण भागात पोहोचण्याचं कठीण काम पूर्ण केलं. स्वर्गीय देवकिसन सारडा यांची दूरदृष्टी आणि संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या योगदानामुळेच हे वृत्तपत्र आज पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत आहे.

सार्वमतचे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करताना आमदार काळे म्हणाले, सामान्य लोकांना समजेल अशी सोपी, प्रवाही भाषा आणि मुद्देसूद मांडणी ही या पेपरची बलस्थाने आहेत. त्यामुळे शेतकरी, दुकानदार, तरुण, महिला सगळ्यांना हा पेपर आपलासा वाटतो. सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात सहकार मंथन परिषदेने झाली आहे, ही खरोखर अभिनंदनास पात्र गोष्ट आहे, सार्वमतने केवळ राजकारणाचाच नाही तर शिक्षण, सहकार, आरोग्य, ग्रामीण विकास यांसारख्या विषयांवर सातत्याने काम केलं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात या सार्वमतचा वाटा अमूल्य आहे. आज अनेक वृत्तपत्रे बाजारात आहेत, पण सार्वमतची खासियत ही आहे की तो जनमानसाशी जोडलेला आहे. वाचकाला आपलंसं वाटणं हेच कोणत्याही माध्यमाचं खरं यश असतं आणि हे यश सार्वमतने प्राप्त केले. राजकीय बातम्यांबरोबरच सहकारी क्षेत्रातील घडामोडींना देखील योग्य जागा दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांना दिशा आणि प्रेरणा मिळाली. आपण दिलेल्या सामाजिक भानाला पुढच्या दशकांत अधिक व्यापक रूप द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सार्वमतने समाजहिताच्या बातम्यांना प्राधान्य दिले- विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सार्वमतने नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे आणि समाजहिताच्या बातम्यांना प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केले. दैनिक सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सहकार मंथन परिषदेत बोलताना विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणात दैनिक सार्वमतच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला. ते म्हणाले,1976 मध्ये श्रीरामपूर येथे दैनिक सार्वमतची सुरुवात झाली. गेल्या पन्नास वर्षांपासून हे वृत्तपत्र अविरतपणे जनसामान्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. मी जेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होतो, तेव्हा रात्री दोन-अडीच वाजता सार्वमतची वेबसाइट रिफ्रेश करून कोपरगाव, नगर जिल्हा आणि परिसरातील घडामोडींची माहिती मिळवायचो.

सार्वमतने केवळ राजकीय बातम्यांपुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगातही सार्वमतने आपले वेगळे स्थान कायम राखले आहे. अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. कोपरगाव तालुका हा सहकाराच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. स्व. शंकरराव कोल्हे, स्व. शंकरराव काळे, बिपीन कोल्हे, माजी आ. अशोक काळे यासारख्या नेत्यांनी सहकाराला बळकटी दिली. राजकीय मतभेद असले तरी सहकारी संस्थांमध्ये शेतकर्‍यांच्या हितासाठी एकजुटीने काम केले गेले. सहकारी संस्थांनी सावकारी पाशातून शेतकर्‍यांना मुक्त केले आणि आर्थिक कणा म्हणून काम केले. सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. नव्वदच्या दशकात सहकारी संस्थांनी राज्याच्या तिजोरीत मोठा निधी जमा केला. आज साखर कारखानदारी, दूध संघ, पतसंस्था आणि बँकिंग क्षेत्रातून लाखो लोकांना रोजगार मिळतो. मात्र काही धोरणात्मक बदल आणि राजकीय हस्तक्षेपांमुळे सहकारी संस्थांना अडचणींचा सामना करावा लागला. काही नेत्यांनी स्वार्थासाठी सहकाराचा वापर केला. ज्यामुळे संस्थांचे नुकसान झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विवेक कोल्हे यांनी प्रवरा साखर कारखान्याच्या स्थापनेचा इतिहास उलगडत सहकार क्षेत्रातील कोपरगाव तालुक्याचे योगदान अधोरेखित केले. पूर्वनियोजित कारखाना कोपरगावमध्ये असावा, असे होते. पण भाग भांडवल गोळा करून त्या कारखान्याला मदत केली गेली. हीच सहकाराची भावना आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सहकाराला बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर सहकार मंत्रालय स्थापन केले. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सहकार धोरण आकार घेत आहे. राज्य सरकारनेही महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत दहा लाख नव्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. राष्ट्रीय बीज उत्पादन सहकारी संस्था, आयात-निर्यात सहकारी संस्था यांसारख्या नव्या उपक्रमांमुळे शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि नफ्याचा वाटा मिळेल.

भारतातील 70-80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न केवळ 12 हजार रुपये आहे, जे चिंताजनक आहे. शेतीपूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगांना सहकाराच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी सहकारी संस्थांनी नव्या क्षेत्रांत पाऊल टाकले पाहिजे. सार्वमतच्या योगदानाचा गौरव करताना ते म्हणाले, सार्वमतने पन्नास वर्षांत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक जागृती आणि सहकार चळवळीला बळकटी दिली आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षात आयोजित विविध उपक्रमांमधून सहकार आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल. सार्वमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही परिषद एक मैलाचा दगड ठरेल. आपण सर्वांनी सहकाराच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि राज्याला पुढे नेण्याचा संकल्प करू या, असे आवाहन त्यांनी केले.

आपली पतसंस्था चळवळ जगात सर्वश्रेष्ठ ठरेल- काका कोयटे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ अहिल्यानगर जिल्ह्यातून सक्षम व्हावी, या उद्देशाने आम्ही जगभरात सहकाराचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात आपली पतसंस्था चळवळ जगात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दैनिक सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सहकार मंथन परिषदेत व्यक्त केला.

श्री. कोयटे पुढे म्हणाले, सहकार कायदा ज्या उद्देशाने निर्माण झाला, त्या उद्देशाला आम्ही पुढे नेत आहोत. मला अभिमान आहे की, ही सहकार चळवळ सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करते. या चळवळीला खर्‍या अर्थाने पुढे नेण्याचे काम ना. विखे पाटील यांनी केले. कोयटे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आयोजित बैठकीचा उल्लेख करताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकारी चळवळीच्या योगदानाची प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय विठ्ठलराव विखे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या सहकारी कारखान्याच्या परंपरेचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, माजी सहकारमंत्री शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हेे यांच्या योगदानाची आठवण करून देत अहिल्यानगर जिल्ह्याला सहकार क्षेत्रातील अग्रणी स्थान मिळवून देण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी पतसंस्था चळवळीपुढील आव्हानांवरही भाष्य केले. विशेषतः आयकर खात्याच्या अधिकार्‍यांकडून पतसंस्थांवर लादला जाणारा कर हा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले. कायद्याप्रमाणे पतसंस्थांना आयकरातून सूट आहे, परंतु आयकर खात्याचे अधिकारी कर लादतात. यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांना आयकरात दिलासा दिल्याचा दाखला देत कोयटे यांनी पतसंस्थांसाठीही असाच दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी संपादक अनंत पाटील यांनी प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ते म्हणाले, सार्वमतने पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, या महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वमतच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले, गेल्या पन्नास वर्षांपासून सार्वमतमध्ये जी उत्स्फूर्तता, धडाडी आणि उत्साह आहे, तो या मातीचा गुण आहे.

सहकार परिषदेच्या निमित्ताने मला सहकाराचे एक तत्त्व आठवते-समता, स्वायत्तता, स्वातंञ्य आणि सर्वांचा विचार. हे तत्त्व सहकारात जसे आहे, तसेच सार्वमतच्या पत्रकारितेतही झिरपले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्वर्गीय देवकिसन भाऊ सारडा यांनी श्रीरामपूर येथे सार्वमतची सुरुवात केली, तेव्हा पत्रकारिता एका नव्या आकाराला येत होती. पत्रकारितेचा स्वभाव, आकार आणि दिशा याबाबत प्रश्न निर्माण होत असताना, या मातीतील सुपुत्रांनी सार्वमतच्या माध्यमातून पत्रकारितेला नवा आयाम दिला. त्याचवेळी या भागात सहकाराचा विस्तारही वेगाने होत होता. सहकार आणि पत्रकारिता या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरल्या आणि सहकाराचे तत्त्व सार्वमतच्या पत्रकारितेत उतरले आहे. शेवटी आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका राजश्री पिंगळे यांनी केले.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...