राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी (Rauri Factory) परिसरात दि. 31 जानेवारी रोजी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळ्याचे (Satsang Ceremonies) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहे. चोरी (Theft) करणार्या चार महिलांची टोळी राहुरी पोलिस पथकाने कोंबीग ऑपरेशन करून गजाआड केली.
गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत दि. 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी राहुरी बाजार समितीच्या मुळा सूतगिरणी मैदान, राहुरी फॅक्टरी, येथे राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील माऊलींचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पो. नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आला होता. तरी देखील छोट्या, मोठ्या चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेले. सदर महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) चोरीची फिर्याद दिली.
त्यानंतर पो.नि. ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. तुळशीदास गिते, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सतिष कुर्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने रात्रभर कोंबीग ऑपरेशन करून चार महिलांना बीड (Beed) येथून ताब्यात घेतले. केशर सुखदेव जाधव (वय 50, रा. गांधीनगर ता. जि. बीड) गवळण पांडुरंग गायकवाड (वय 40 रा. शास्त्रीनगर ता. जि. बीड), पुजा विशाल वाघमारे (वय 25 रा. खोकर माहे ता. शिरुर जि. बीड), पुजा विशाल मोहिते (वय 27 रा. साईतेज कॉलनी, नेवासा फाटा, ता. नेवासा) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. पोलिस पथकाने त्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चार ही महिला आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.