पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हिजी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सुपा-पारनेर रस्त्यालगत जांभूळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये व्हिजी कार्बन कंपनी आहे. या कंपनीत टायरपासून ऑईल तयार केले जाते. यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात जुने टायर ठेवले होते. या कंपनीत गुरूवार दि. 26 रोजी सकाळी अचानक आग लागली. कंपनीत टायर असल्याने बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. यादरम्यान कंपनी परिसरात सर्वत्र धूराचे लोटच्या निर्माण झाले होते.
कंपनीच्या मागील बाजूस लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे जुने टायर जळुन खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगर व रांजणगाव गणपती येथील अग्निशमनच्या गाड्या बोलाविण्यात आल्या. मात्र नेहमी प्रमाणे गाड्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत टायरने आणखी पेट घेतला. या आगीचे कारण अद्याप समजले नाही.