अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवार (दि.21) शेवटचा दिवस असून आतापर्यंत संचालकांच्या 21 जागांसाठी 309 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत इच्छुकांची जत्राच होणार असल्याचे चित्र आहे.दरम्यान, आजपासून दाखल अर्जांची छाननी होऊन उद्या 25 तारखेला वैध नामनिर्देशन पत्रांची (अर्जाची) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. तत्पूर्वी 14 फेबु्रवारीपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. सोसायटीच्या विविध मतदारसंघातून आतापर्यंत 309 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यात सर्वात उमेदवारी अर्ज हे सर्वासाधारण मतदारसंघातून 145 दाखल आहेत. यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता माध्यमिक शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक माध्यमिक शिक्षक असले तरी सोसायटीचे सभासद 9 हजार 152 असून तेच मतदानाला पात्र आहेत. जिल्हा निबंधक गणेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
आजपासून फेब्रुवारीला दाखला अर्जांची छाननी होऊन उद्या (दि.25) तारखेला वैध नामनिर्देशन पत्राची (अर्जाची) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. 12 मार्चला निवडणूक लढवणार्या उमेदवारांची अंतिम यादी व त्यांचे निवडणूक चिन्ह हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षक सोसायटीसाठी निवडणूक लढवणार्या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. त्यानंतर 24 मार्चला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले. मतमोजणी झाल्यानंतर लगेचच निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
असे आहेत दाखल अर्ज
सर्वसाधारण प्रवर्ग 145, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ 17, महिला राखीव 17, ओबीसी राखीव 16 आणि भटके विमुक्त 14 असे 309 उमेदवारी गुरूवार अखेर दाखल झालेले आहेत.