अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू आणि राजकारणाचे केंद्रबिंदू असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवार (दि.4) रोजी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून यात माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 9 हजार 152 मतदार अंतिम करण्यात आले आहेत. लवकर सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यक्रम तयार करून तो राज्य सहकार विकास प्राधिकरणाच्या मान्यतेने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
2024 मध्ये लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूका झाल्या. यामुळे जिल्ह्यातील 425 सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबल्या होत्या. मात्र, चालू वर्षी राज्य सरकार विभागाच्या आदेशाने रखडलेल्या या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. यातील बहुतांशी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सहकार विभागाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. यातील महत्वाची संस्था असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्त करण्यात येवून राज्य सहकार विकास प्राधिकरण यांच्याकडे सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. ही मान्यता मिळताच माध्यमिक शिक्षक सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
प्रारूपमध्ये होते 9 हजार 154 सभासद
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी प्रारूप यादीत 9 हजार 154 सभासद मतदार होते. आधी ही संख्या 9 हजार 430 होती. मात्र, 150 सभासद हे मयत असून 42 सेवानिवृत्त तर 84 सभासद थकबाकीत होते. या सर्वांना वगळून 9 हजार 154 सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. यातील दोन सभासद वगळून 9 हजार 154 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
असे आहेत मतदार
सोसायटी मुख्यालयात नगर शहर 875, नगर तालुका 767, जामखेड 107, पारनेर 48 आणि श्रीगोंदा 81 असे 1 हजार 878 सभासद आहेत. यासह पारनेर 581, श्रीगोंदा 439, कर्जत 330, पाथर्डी 911, शेवगाव 664, नेवासा 9 असे एकत्र असून पुन्हा नेवासा 655, श्रीरामपूर 505, राहुरी 670, कोपरगाव 342, संगमनेर 1 हजार 11, नाशिक 34, अकोले 906 आणि राहाता 219 असे मतदार आहेत.