Friday, May 8, 2026
HomeनगरParner : आमच्या घामाचा पैसा आम्हाला परत द्या

Parner : आमच्या घामाचा पैसा आम्हाला परत द्या

पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा आक्रोश

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेटमध्ये आपले कष्टाचे गुंतवलेले पैसे दोेन वर्षांपासून परत मिळत नसल्याने ठेवीदार मंगळवारी(दि.7) रस्त्यावर उतरले. पारनेर बाजार तळावर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी, कष्टकरी आणि निवृत्त कर्मचार्‍यांच्या डोळ्यातील अश्रू हे केवळ आर्थिक नुकसान नाही, तर एका विश्वासाचा पूर्णपणे अंत झाल्याचे प्रतीक आहेत, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आम्ही पतसंस्थेचे आकडे बघून नाही, तर माजी आमदार विजयराव औटी यांच्या नावावर आणि शब्दावर विश्वास ठेवून आयुष्यभराची पुंजी इथे ठेवली होती, असे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व लोकांमध्ये एकच सूर होता – ज्या विश्वासाने आम्ही पैसे ठेवले, त्याच विश्वासाने आता साहेबांनी पुढाकार घेऊन आमचे पैसे मिळवून द्यावेत. छोटे व्यापारी, सरकारी नोकरदार आणि ज्यांच्या संसाराची गाडी व्याजावर चालत होती, अशा वृद्धांची दुर्दशा पाहणे खूप कठीण आहे. त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाची गाडी अडचणीत आली आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू औटी यांनी ठेवीदारांच्या भावनांना वाट करून दिली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीही मिळाले नसल्याने आता केवळ तोंडी चर्चा नाही, तर खासदार, आमदार, पालकमंत्री आणि थेट दिल्लीपर्यंत लेखी निवेदने दिली जाणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय आणि कृती पाहिजे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. पारनेर निबंधक कार्यालयासमोर लवकरच साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. कोणाचे मुलीचे लग्न थांबले आहे, तर कोणाच्या औषधोपचाराचा प्रश्न आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर हजारो कुटुंबांच्या जगण्याचा-मरण्याचा प्रश्न आहे, असेही राजू औटी म्हणाले.

गोरगरीब जनतेचा पैसा सध्या संकटात आहे. प्रशासनाने आणि संस्थेच्या धुरिणांनी या आक्रोशाची दखल वेळेत घेणे गरजेचे आहे. अन्यथा, हा संताप आगामी काळात मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ठेवी आम्हाला मिळाव्यात ही एकच मागणी घेऊन पारनेरचा सामान्य माणूस आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे राजू औटी म्हणाले.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...