Wednesday, January 15, 2025
Homeनगरसर्व्हर डाऊन, ई पॉझ मशीन बंदमुळे धान्य वितरण ठप्प

सर्व्हर डाऊन, ई पॉझ मशीन बंदमुळे धान्य वितरण ठप्प

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने ई पॉझ मशिनद्वारे वितरण होणारे मोफत धान्य वितरण सर्वरच्या अडचणीमुळे पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. या वर्षात अनेकदा अशाप्रकारे सर्व्हरच्या तर कधी एनआयसीच्या तांत्रीक बिघाडाचे कारण समोर येवून वितरण प्रणालीवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यातच सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यातील धान्य वितरण मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे रखडले असून पॉज मशिन बिघडले अन् धान्य वितरण रखडले अशीच अवस्था नगर जिल्ह्याची नव्हे तर अख्या महाराष्ट्राची झाली आहे. धान्य वितरणाबरोबर लाभार्थींची केवायसीचे काम ही ठप्प झाल्याने कार्डधारकांबरोबर दुकानदारांना ही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच या व्यत्ययामुळे धान्य वितरण केवळ मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले आहे. धान्य दुकानात असूनही दुकानदारांना त्याचे वितरण करता येईना, धान्य घेण्याकरिता कार्डधारक आपले कामधंदा सोडून दुकानात अनेकजण हेलपाटे घालताना दिसत आहे. बिघाड झालेले पॉज मशीन केव्हा दुरुस्त होईल हे दुकानदारांनाही सांगता येत नसल्यामुळे कार्डधारकांना तास न् तास ताटकळत दुकानासमोर बसून राहुन रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विधानसभा निवडणुका पार पडताच स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील उणिवा प्रकर्षाने समोर येत आहेत. डिसेंबर महिन्याचे गेल्या एक तारखेपासून आजतागायत वितरण करणारे ई पॉज मशीन सर्व्हरच्या अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे कार्डधारकांबरोबरच स्वस्त धान्य वाटप करणारे धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्डधारक व लाभार्थी रेशनकार्डधारक यांच्यात विनाकारण वाद होताना दिसत आहे. मशीन बंद आहेत तर दुकान कशाला उघडता बंद ठेवा, अशी उर्मट शब्द हेलपाटे घालणारे कार्डधारक वापरत आहेत.

वरिष्ठ पातळीवर याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन दिले असता लवकरच ही प्रणाली सुरळीत होईल एवढेच आश्वासन वरिष्ठांकडून मिळत आहे. त्यामुळे कार्डधारकांना काय उत्तर द्यायचे, केव्हा मशीन सुरू होईल हे निश्चित सांगता येत नसल्यामुळे कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये वादावादी होत आहे. सध्या कांदा लागवड, गहू पेरणी तसेच इतर शेतीच्या मशागतीचे कामाला वेग आलेला आहे. अशात मोफत धान्य असल्यामुळे ते वेळेवर मिळावे, याकरिता कार्डधारक आपला कामधंदा सोडून दुकानात चकरा मारताना दिसत आहे. याबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी मंत्रालय स्तरावर निवेदन दिलेले असल्याचे अहिल्यानगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले. असे असले तरी वितरण व्यवस्था नेमकी केव्हा सुरळीत होईल, याबाबत गोरगरीब कार्डधारकाकडून विचारणा होत आहे. डिसेंबरचे तेरा दिवस लोटलेले असतानाही धान्य वितरण ठप्प झाले आहे.

एकीकडे शासन महिन्याच्या सात तारखेला अन्न दिवस तर पहील्या पंधरवाड्यात अन्न सप्ताह दिवस साजरा करण्याचे आदेश देत महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यात लाभार्थींना धान्य देण्याचा आग्रह धरत आहे. त्याचबरोबर लाभार्थींची ही केवायसीचे काम पूर्ण करण्याचे ही आदेश दुकानदारांना दिले जात आहे, ही केवायसी करण्याकरिता कार्डधारक दुकानात चकरा मारत आहेत. परंतू पॉज मशीन बंद असल्यामुळे ही केवायसी देखील होऊ शकत नाही. त्यातच शासन धान्य वाटपास मुदतवाढ देखील देत नाही. त्यामुळे या महिन्यात अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. एनआयसी ने तातडीने सर्व्हरमध्ये येणारा अडथळा दूर करावा, अशी मागणी अहिल्यानगर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, ज्ञानेश्वर वहाडणे, अशोक लकारे, काशिनाथ आरगडे, गणपतराव भांगरे, सुरेशराव उभेदळ, बाबासाहेब कराड, शिवाजीराव मोहिते, विजयराव दिघे, विश्वासराव जाधव, माणिक जाधव, रावसाहेब भगत, सतीश हिरडे, खंडू भुकन, प्रकाश भोसले, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या