सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पुणे महापालिका प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्रातील साडेसात लाख नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आतापर्यंत 2 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी सात दिवसांचं नियोजन करण्यात आलं आहे. सात दिवसांत 73 मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून स्क्रिनिंग केलं जाणार आहे. पुण्यातील पाच क्षेत्रीय कार्यालय परिसरात नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये भवानी पेठ, येरवडा, ढोले पाटील रोड, कसबा – विश्रामबाग वाडा, शिवाजीनगर-घोले रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे, असं अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितलं.
पुण्यात येणार्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. परराज्यात, इतर जिल्ह्यात अडकलेले नागरिक आता एसटी आणि रेल्वे सुरु झाल्याने पुण्यात परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे परराज्यात, जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, इतर नागरिक पुणे जिल्ह्यात परतत आहेत. हे नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्हयातील शहरी, ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर
पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारच्या वर पोहोचली आहे. पुणे शहरातील भवानी पेठमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर गेला आहे. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील भवानी पेठनंतर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ढोले पाटील विभागात 406 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी फक्त 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 1800 रुग्ण आढळले आहेत. यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, येरवडा-धानोरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील एकूण 46 प्रभागापैकी 8 प्रभागात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.




