Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' (G-Mark) जाहीर

‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड’ (G-Mark) जाहीर

आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान

- Advertisement -

नाशिक |

महाराष्ट्र शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ने (Shabari Naturals) जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली आहे. शबरी नॅचरल्सच्या अद्वितीय आणि आकर्षक पॅकेजिंगला जागतिक स्तरावर डिझाईन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जाणारा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ (G-Mark – Global Design Award) जाहीर झाला आहे. यापुर्वी देशातील डिझाईन क्षेत्रातील सर्वोच्च असा इंडिया डिझाईन मार्क हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जपान इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन प्रमोशन (Japan Institute of Design Promotion) तर्फे दिला जाणारा हा जागतिक पुरस्कार (https://www.g-mark.org/en) डिझाईन क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या सन्मानांपैकी एक मानला जातो. या भव्य यशामुळे महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि त्यांची उत्पादने आता खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ झाली आहेत.

राज्यातील आदिवासी संस्कृती जगापर्यंत पोहचावी तसेच आदिवासी बांधवांचे प्रिमियम उत्पादने देखील जगासमोर यावे या बृहद उद्देशाने राज्य शासनाने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड (भाप्रसे) यांनी हा ब्रँड विकसित केला होता. या ब्रँडमधील प्रिमियम वस्तुंसोबतच या ब्रँडच्या पॅकेजिंगमध्ये वारली, गोंडी आणि चित्रकथी या चित्रकलेचा तसेच आदिवासी बांधवाच्या विविध दंतकथांचा समावेश आहे.

‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी संकलित केलेली नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने (उदा. मध, मोहफुलांपासून विविध उत्पादने, चारोळी, बांबू उत्पादने इ.) बाजारात आणली जातात. या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या पारंपारिक कला, त्यांची जीवनशैली आणि निसर्गप्रेमाचे दर्शन अत्यंत कल्पकतेने घडवण्यात आले आहे. शबरी नॅचरल्सचे हे पुरस्कारप्राप्त जागतिक दर्जाचे ‘पॅकेजिंग डिझाईन’ या ब्रँडवर साकारले आहे.

या पॅकेजिंगने उत्पादनांना एक प्रीमियम लुक दिला असून डिझाईनच्या माध्यमातून आदिवासी जीवनातील समृद्धता आणि शाश्वतता जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे. ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ (G-Mark) च्या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी या पॅकेजिंगमधील सांस्कृतिक मूल्य शाश्वतता आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक करत या डिझाईनची निवड केली आहे.

हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे आदिवासी संस्कृतीचा तसेच आदिवासी बांधवांच्या कष्टाचा आणि त्यांच्या जगण्याचा सन्मान आहे. ‘जी-मार्क’ (G-Mark) सारख्या जागतिक पुरस्काराची मोहोर उमटल्यामुळे ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक ओळख, विश्वासार्हता आणि मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. यातून आदिवासी समुदायाच्या शाश्वत विकासाला आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
प्रा. डॉ. अशोक वुईके, मंत्री, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य

शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती साजरी करत असताना पॅकेजिंगसाठी जागतिक स्तरावरील पुरस्कार प्राप्त होणे ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. या ब्रँडला आता जागतिक व्यासपीठाने ओळख निर्माण करुन दिली आहे. या पुरस्कारासोबतच आता जबाबदारी देखील वाढली आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी आदिवासी बांधव आहेत. त्यांच्याकडूनच ही प्रेरणा येत असते.
लीना बनसोड (भाप्रसे), आयुक्त, आदिवासी विकास विभाग

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...