Tuesday, November 24, 2026
Homeनाशिकशालार्थ घोटाळाः गरुडांसह हिंगोणेकर तुरुंगातच, संस्थाचालक माजी शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात जाणार

शालार्थ घोटाळाः गरुडांसह हिंगोणेकर तुरुंगातच, संस्थाचालक माजी शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात जाणार

नाशिक | प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती (शालार्थ आयडी) घोटाळ्यात मुख्य संशयितांना नाशिकरोड सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. शिक्षण संस्थाचालक तथा भाजप पदाधिकारी संजय गरूड, त्यांचे बंधू दीपक गरूड आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांचे जामीन अर्ज नाशिकरोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे तिन्ही संशयितांचा नाशिकरोड कारागृहातील मुक्काम तूर्तास कायम राहणार असून, ते आता न्याय मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी तिन्ही प्रकरणांतील जामीन अर्ज फेटाळताना महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. हा गुन्हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून शिक्षणासाठी आलेला शासकीय निधी पद्धतशी रपणे लुटण्याचा गंभीर प्रकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा एक खोल वर पसरलेला व्हाईट कॉलर क्राईमम (गुन्हेगारी) असून, यात मोठ्या रॅकचे अधिकारी आणि संस्थाचालकांची साखळी जोडलेली आहे. संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी व शासकीय दस्तऐवजांशी छेडछाड करू शकतात तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतात.

- Advertisement -

विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं; पराभवाचं खापर थेट शिंदे गटावर फोडलं

संशयित संजय गरूड हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रशासक आहेत. या संस्थेमार्फत १५ शाळा चालवल्या जातात. या शाळांमधील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यात आली. तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या कालावधीत कागदपत्रांत फेरफार करून व आउटवर्ड रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हा बोगस प्रताप रचण्यात आला होता. दीपक गरूड यांनी संस्थेचे सहसचिव म्हणून काम पाहताना अन्य सहकाऱ्यांच्या सोबतीने बोगस कागदपत्रे तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण मंडळाचे निवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी, शशिकांत हिंगोणेकर, संजय गरूड, दीपक गरूड आदी ९ जणांना अटक केलेली आहे.

घोटाळ्याची व्याप्ती वाढली
राज्य शासन आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगाने सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तपासासाठी थेट ११ विशेष पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके, डॉ. सचिन बारी यांच्यासह ४६ अधिकारी व ८० हून अधिक अंमलदार सखोल तपास करत आहेत. मार्च २०१९ ते जून २०२५ या कालावधीत संपूर्ण नाशिक विभागात बोगस शालार्थ आयडी तयार करून सुमारे १५० ते १७० कोटी रुपयांचा शासकीय निधी लाटण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...