शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shinganapur
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे 1 मार्च पासून शनीदेवाला अर्पण करण्यासाठी केवळ ब्रँडेड कंपनीचेच तेल वापरण्याच्या सूचना देवस्थान विश्वस्त मंडळाने व्यावसायिकांना दिल्या आहेत. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय तसेच शनिशिंगणापूर ग्रामसभेच्या निर्णयानुसार श्री शनि देवाच्या स्वयंभू शिळेची संभाव्य झिज टाळण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) मान्यता प्राप्त खाद्यतेलच शनी मूर्तीवर अर्पण करण्याची परवानगी देण्याचे ठरले आहे.
त्यामुळे सर्व व्यावसायायिकांना विक्रीसाठी एफएसएसएआय मान्यता प्राप्त ब्रँडेड कंपनीचे खाद्यतेलच ठेवावे व अर्पण करण्यासाठी येणारे खाद्यतेलचे बॉटल, ड्रम, डबा इत्यादी पॅकिंगवर एफएसएसएआय परवाना क्रमांक असावा अशा सांगितले आहे. याव्यतिरिक्त शनी मंदिरात आलेले तेल न स्वीकारता मागे पाठविले जाईल, अशाप्रकारची नोटीस शनैश्वर देवस्थानच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आलेली आहे.