मुंबई | Mumbai
राज्याच्या विशेष अधिवेशनाला (Convention) सुरुवात झाली असून आमदारांचा शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. २८८ आमदारांपैकी काही आमदार (MLA) आज तर उर्वरित आमदार उद्या शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधीच्या (Swearing) पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग करत ईव्हीएमचा निषेध नोंदवला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याची भूमिका घेतली.तसेच लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मारकडवाडी असे पोस्टर झळकावत घोषणाबाजी केली.या पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मारकडवाडीला जाण्याची शक्यता असून ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या लाँग मार्च मध्य सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : एमडीमुळे नाशिक पुन्हा चमकले
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान (Voting) घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसने ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होणार असल्याची चर्चा होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व आमदार उत्तम जानकर यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
हे देखील वाचा : विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, कारण काय?
आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की “ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणाऱ्या ईव्हीएमविरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही. परिणामी संपूर्ण राज्यात ‘मारकडवाडी पॅटर्न’ राबवायला सुरुवात होईल, याची मला खात्री आहे. येत्या रविवारी (८ डिसेंबर) शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत. राहुल गांधी देखील ईव्हीएमविरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार होवो! असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल (Result) जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. ६४ वर्षांच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य महायुतीला मिळाले आहे. हा निकाल पाहून राज्यभरातून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त होऊ लागला आहे. विरोधकांनी देखील ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदानाला विरोध केला आहे.