पुणे | Pune
उपमुख्यमंत्री, दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच पुण्यात एकत्र येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पवार कुटुंबाची बैठक बोलावली आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंब हे मोदी बाग येथे एकत्र येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना देखील स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींनंतर संपूर्ण कुटुंब अशा प्रकारे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यातील मोदीबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज हे सर्व पवार कुटुंब एकत्रित येणार आहे, अशी माहिती आहे.
बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला शरद पवारांसह प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, सदानंद सुळे, अभिजीत पवार असे सर्व कुटुंब या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अशाप्रकारे अचानक पवार कुटुंबाची बैठक बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बैठकीचे कारण काय?
या भेटीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवणासाठी म्हणून पवारांनी आमंत्रित केलेले आहे. शरद पवार पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत, उद्या पुन्हा ते मुंबईला जाणार आहेत. आजच्या या मुक्कामा दरम्यान शरद पवारांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवणासाठी म्हणून आमंत्रित केले आहे, त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न देखील ठरलेले, याचे देखील निमित्त आहे का अशी चर्चा आहे, तसेच अजित पवारांच्या निधनाला ३ महिने पूर्ण झाल्याने याच पार्श्वभूमीवर कुटुंबीयांशी चर्चा करण्यासाठी पवारांनी ही बैठक बोलवली असावी, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर होत असलेल्या आजच्या भेटीचे नेमके काय कारण आहे? हे लवकरच समजेल.
जय पवार, सुनेत्रा पवार उपस्थित राहणार का?
जय पवार हे परदेशात असल्याने उपस्थित राहू शकणार नाहीत. सुनेत्रा पवारही मुंबईत आहेत. त्यामुळे आता कोण-कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येत असले तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





