Thursday, July 9, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येण्याची चर्चा; CM फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis : शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येण्याची चर्चा; CM फडणवीस म्हणाले…

दिल्ली । Delhi

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात एका नव्या समीकरणाची आणि संभाव्य राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा रंगली होती.

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मुंबईत अत्यंत ‘गुप्त’ बैठक पार पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या भेटीनंतर शरद पवार गट थेट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार आणि महाराष्ट्राच्या सत्तेचे चित्र पुन्हा बदलणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला असून, एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

मंगळवारी दिल्लीत एका तातडीच्या आणि महत्त्वाच्या बैठकीसाठी गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुतीमधील संभाव्य बदलांच्या सर्व शक्यता सपशेल फेटाळून लावल्या. महाराष्ट्रातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) कोणताही नवीन पक्ष सामील होणार नसल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले. फडणवीस यांच्या या थेट विधानामुळे विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात झालेली ती गुप्त बैठक अखेर निष्फळ ठरली का? असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? “महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. सध्या महायुतीत जे पक्ष आहेत, तेच पक्ष एनडीएमध्ये राहतील. कुठल्याही नवीन पक्षाला सोबत घेण्याबाबत आमची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तोडफोडीच्या राजकारणावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, “आम्ही शरद पवारांच्या सोबत असलेल्या कुणालाही तोडण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही आहोत. जे आमदार किंवा खासदार सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत, त्यांच्यापैकी कुणालाही आपल्या बाजूला ओढण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.”

गुप्त बैठकीत नेमकं काय शिजत होतं? दुसरीकडे, सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत माहितीनुसार, विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या या बैठकीत जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुतीत सहभागी झाला, तर सत्तेचे आणि मंत्रिपदांचे वाटप कसे असू शकते, यावर प्राथमिक चाचपणी झाली होती. इतकेच नव्हे तर, या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षातील एका अतिशय वरिष्ठ नेत्यासोबतही स्वतंत्र बैठक घेतली. या दुसऱ्या बैठकीत, जर पक्ष सत्तेत सामील झाला तर आपली नेमकी भूमिका काय असावी, यावर खल झाल्याचे समजते.

या संपूर्ण घडामोडींवर जेव्हा थेट जयंत पाटील यांना संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याची गोष्ट मान्य केली. मात्र, राजकीय वर्तुळातील चर्चांना शांत करत त्यांनी ही केवळ एक ‘अनौपचारिक भेट’ असल्याचे सांगत या बैठकीतील गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांच्या दिल्लीतील विधानानंतर या सर्व राजकीय हालचालींवर तूर्तास पडदा पडला आहे.

ताज्या बातम्या

Newasa : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

0
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या...