मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. “जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये,” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच सध्याच्या परिस्थितीला उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असंही नमूद केलं. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. वर्तमानपत्रावरून जरांगेंनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला. त्यात आणखी काही वाढ झाली. सरकारने मनोज जरांगेंना दिलेल्या वेळेत आरक्षणावर निर्णय घेऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही. जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
दरम्यान मराठा आरक्षण लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरंगे यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या मूळ गावी आंदोलन सुरू केले. सरकारने आम्हाला ३० दिवसांची मुदत मागितली पण मी ४० दिवस मागितले होते. आता सरकारला खूप वेळ दिला आहे, पण आता थांबणार नाही, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवरून सरकार काही व्यक्तींना आपल्या विरोधात भडकवत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आणि मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीतरी दबाव आणत असल्याचा दावा केला.