अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेवगाव येथील शेअर मार्केटचे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता पारनेर येथील व्यावसायिकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 53 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. बेकरी व्यावसायिक शेखर विलास औटी (वय 29 रा. पाटाडी वस्ती, कान्हुर रस्ता, पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल सिताराम थोरात (रा. करंदी, ता. पारनेर), पोपट भाऊ रोहकले, गुलाब भाऊ रोहकले (दोघे रा. भाळवणी, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना पारनेर येथील नवी पेठेतील स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या वरच्या गाळ्यात एटी ट्रेडींग कंपनी नावाने सुरू असलेल्या कार्यालयात 20 जून 2023 ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंत तसेच 23 जुलै 2021 ते 23 सप्टेंबर 2023 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अमोल थोरात याने व्यावसायिक शेखर औटी व इतरांना शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवा, त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल असे आमिष दाखविले. औटी व इतरांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तसेच थोरात याने त्यांना शेअर मार्केटचे व्हिडीओ अॅप्लिकेशन दाखवून विश्वास संपादन केला. 20 जून 2023 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत प्रवीण मच्छिंद्र पठारे यांच्याकडून तसेच 23 जुलै 2021 ते 23 सप्टेंबर 2023 या कालावधीत पारनेर येथील स्वराज ट्रॅक्टरच्या शोरूमच्या वरील एका गाळ्यात सुरू असलेल्या एटी ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात औटी यांच्याकडून थोरात याचा मामा पोपट भाऊ रोहकले व गुलाब भाऊ रोहकले यांनी संगनमताने 53 लाख चार हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात घेतले.
आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादी औटी, प्रवीण पठारे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी संशयित आरोपींकडे पैशाचा परतावा मागितला. मात्र त्यांनी फिर्यादी व पठारे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व पैसे परत दिले नाही. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर औटी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी करून बुधवारी (8 जानेवारी 2025) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जी. एन. डहाळे करीत आहेत.
शेवगाव नंतर पारनेर
शेअर ट्रेडिंग कंपनीचे ऑफिस उघडून लोकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तो न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. शेवगाव येथील अनेकांची अशा पध्दतीने फसवणूक झाली. त्यातील काही आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. काही संशयित अद्यापही पसार आहेत. गुंतवणूक करणार्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. आता पारनेर तालुक्यातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.