Sunday, October 25, 2026
Homeनगरशेवगाव तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत; ४८ हजार २९३ हेक्टरवर पेरण्या

शेवगाव तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत; ४८ हजार २९३ हेक्टरवर पेरण्या

शेवगाव (तालुका प्रतिनिधी)

खरीप हंगामाच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या उरकल्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने उगवण झालेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी तो केवळ रिमझिम स्वरूपाचा असल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आता दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

तालुक्यात यंदा खरीप हंगामासाठी ६५ हजार ११० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८ हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून सुमारे २६ टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी बाकी आहे. पावसाची आकडेवारीही चिंताजनक आहे. जून महिन्यात ६९.५ मिमी, तर जुलैमध्ये गुरुवारअखेर केवळ २४.७ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान अवघे ९८.६ मिमी इतकेच आहे. अद्याप तालुक्यात एकदाही जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार पीकनिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष पेरणी पुढीलप्रमाणे झाली आहे : बाजरी १६,००० हेक्टरपैकी ९७० हेक्टर, कापूस ३८,५०० पैकी ३६,१८८ हेक्टर, तूर १४,५०० पैकी ८,५४२ हेक्टर, सोयाबीन ३,८०० पैकी ८९३ हेक्टर, उडीद ४,३५० पैकी १,०४७ हेक्टर, मुग १,९५० पैकी ४२५ हेक्टर आणि मका २१० हेक्टरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय १,६६२ हेक्टर क्षेत्रावर नव्या उसाची लागवड करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतांमध्ये तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेळेत दमदार पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे कृषी विभागाने खतांचा पुरवठा नियोजित केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष बाजारात युरिया व डीएपी खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या खतांचा बफर स्टॉक तातडीने खुला करून शेतकऱ्यांना पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : संगमनेर, कोपरगाव, नगर आणि श्रीगोंद्याच्या हाती सत्तेची गणित!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीसाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच तालुकानिहाय सभासद मतदारसंख्येचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये...