राहाता |प्रतिनिधी| Rahata
साईनगरीत दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या बॅगांवर (Devotees Bags) डल्ला मारणार्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. शिर्डीतील (Shirdi) भक्तनिवास परिसरातून बॅग लंपास करणार्या दोन सराईत चोरट्यांना श्रीरामपूर (Shrirampur) परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून महागडा आयफोन आणि अमेरिकन डॉलरसह 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कर्नाटक (Karnataka) राज्यातील रायचूर येथील भाविक पुजीता गोविंद रेड्डी (वय 25) हे आपल्या कुटुंबासह 24 डिसेंबर 2025 रोजी शिर्डीत दर्शनासाठी आले होते. रात्री 8 वाजेच्या सुमारास शिर्डी साईबाबा संस्थानच्या 500 रूम गेटवर त्यांनी आपली बॅग ठेवली असता, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी नजर चुकवून ती लंपास केली. या बॅगेत महागडा मोबाईल, भारतीय व अमेरिकन चलन (American Currency) आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1040/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिर्डी परिसरात वाढत्या बॅग लिफ्टिंगच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हेगार शोधण्याचे कडक आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिपक मेढे यांच्या विशेष पथकाने तांत्रिक कौशल्य आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले. 7 जानेवारी रोजी ही पथक श्रीरामपूर परिसरात असताना, दोन संशयीत तरुण अशोकनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आशिष रविंद्र मंगलम (वय 20, रा. अशोकनगर, श्रीरामपूर) आणि विठ्ठल संजय शेलार (वय 20, रा. निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी शिर्डीतील बॅग चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीचा आयफोन आणि 10 हजार रुपयांचे विदेशी चलन असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख किरणकुमार कबाडी, पीएसआय दिपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या टोळीने अजून किती भाविकांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.





