Saturday, May 30, 2026
HomeनगरShirdi News : साई मंदिरात प्रामाणिकतेचा आदर्श! सुरक्षा रक्षकाने परत केली ९...

Shirdi News : साई मंदिरात प्रामाणिकतेचा आदर्श! सुरक्षा रक्षकाने परत केली ९ लाखांची रोख रक्कम आणि पासपोर्ट

शिर्डी (प्रतिनिधी)

- Advertisement -

शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात अमेरिकेतील एका साईभक्ताची सुमारे ९ लाख रुपये किंमतीची बॅग सुरक्षा कर्मचाऱ्यास सापडली आणि ती तातडीने परत करून साईबाबा संस्थानच्या एका कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा एक उत्तम आदर्श जगासमोर ठेवला आहे.

११ डिसेंबर २०२५ रोजी श्री साईबाबांची धूप आरती झाल्यानंतर मंदिराच्या मागील परिसरात सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांना एक अनोळखी बॅग दिसली. ही बॅग दिसताच त्यांनी तात्काळ आसपासच्या साईभक्तांकडे चौकशी केली, मात्र बॅगेचा मालक कोण याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी ती बॅग संरक्षण कार्यालयात जमा केली.

कार्यालयात बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगेमध्ये दहा हजार यूएस डॉलर (भारतीय चलनात ज्याचे मूल्य अंदाजे ९ लाख रुपये आहे) आणि एक पासपोर्ट आढळला. पासपोर्टवर “मोहित धवन” असे नाव होते. ते अमेरिकेचे रहिवासी असून साई दर्शनासाठी आले होते. त्वरित या नावावरून घोषणा (अनाउन्समेंट) करण्यात आली.

घोषणा ऐकून काही वेळातच संबंधित साईभक्त मोहित धवन हे संरक्षण कार्यालयात आले. आवश्यक ती पडताळणी करून त्यांची रक्कम आणि पासपोर्ट त्यांना सुरक्षितपणे परत करण्यात आले. या घटनेमुळे साईभक्त मोहित धवन यांनी श्री साईबाबा संस्थानचे विशेष आभार मानले आणि संस्थेच्या उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेबद्दल मनापासून कौतुक केले.

सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांच्या या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि तत्परतेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा टीम नेहमीच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या किमती वस्तूंच्या संरक्षणासाठी तत्पर असते. अशा प्रकारच्या प्रामाणिकतेच्या घटनांमुळे संस्थेची विश्वसनीयता अधिक बळकट होते, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

संस्थानच्या त्रिस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षा सन्मान योजना’ प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाखो रुपये किंमतीचे सोने, जडजवाहीर, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर किमती वस्तू त्यांच्या मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आल्या आहेत. साई मंदिर सुरक्षा अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी, यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून सुरक्षा रक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या या तत्पर सेवेमुळे शिर्डीतील साई मंदिराचे पावित्र्य आणि संस्थेची कर्तव्यनिष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाेकराने लुटले मालकिणीचे घर; साडेतीन लाखांचे दागिने...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik घरकाम करणाऱ्यांवर दाखवलेला अतिविश्वास पुन्हा एकदा महागात पडल्याची घटना नाशिकमधील (Nashik) उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर (Gangapur Road) उघडकीस...