शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पवित्र तीर्थक्षेत्र शिर्डी आणि परिसरात जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधींची फसवणूक करणार्या एका हायप्रोफाईल टोळीचा पोलिसांनी बुरखा फाडला आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सध्या विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेला कुप्रसिद्ध भोंदू बाबा कॅप्टन अशोककुमार खरात आणि त्याच्या प्रतिष्ठित भक्तांनी मिळून शिर्डीतील एका शेतकर्याला कंगाल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत साकुरी येथील व्यावसायिक अरविंद पांडुरंग बावके आणि किरण नानासाहेब सोनवणे यांना बेड्या ठोकल्या आहे.
शिर्डी येथील फिर्यादी रावसाहेब नानासाहेब गोंदकर यांना ऑगस्ट 2023 मध्ये 3 कोटी रुपयांची गरज असताना, संशयित आरोपी अशोक खरात याने दरमहा 2 टक्के व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र हा व्यवहार केवळ पैशापुरता मर्यादित नव्हता. खरातच्या भोंदूगिरीला भुललेले आणि स्वतःला त्याचे भक्त म्हणवणारे साकुरीचे व्यावसायिक अरविंद बावके, किरण सोनवणे, अशोक परभत तांबे आणि खरातची पत्नी कल्पना खरात यांनी या अगतिकतेचा फायदा घेतला. फिर्यादीची 4 एकर जमीन (गट नं. 106/2) सुरक्षितता म्हणून स्वतःच्या नावावर करून घेत 1 कोटी 64 लाख रुपये व्याजापोटी उकळले आणि शेवटी जमीन परत करण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली.
या गुन्ह्यातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे आरोपीं अरविंद बावके हा साकुरी येथील एक नावाजलेला व्यावसायिक असतानाही तो या भोंदू बाबाच्या काळ्या कृत्यांचा भागीदार बनला. किरण सोनवणे याने तर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या स्वाक्षरीच्या चेकचा गैरवापर करत बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर लांबवली. समाजमाध्यमांवर आणि सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित म्हणून वावरणारी ही मंडळी प्रत्यक्षात भोंदू खरातच्या जमीन घोटाळ्याच्या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड होत आहे. या व्यवहारावेळी हजर असलेले प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी, जितेंद्र शेळके आणि सचिन वाणी यांचीही कसून चौकशी करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे.
शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रजि न. 0213/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(2), 318(4) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39 व 44 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंग जाधव करत आहेत. या टोळीने केवळ विश्वासघात आणि आर्थिक फसवणूकच केली नाही, तर सावकारी कायद्याचेही सरळ उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कोपरगाव, राहाता तालुक्यातील काही जणांचीही याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शिर्डी येथे जमीन खरेदी प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात व त्याच्या कुटुंबीयांवरही कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला पोलिसांनी त्याच्या नाशिकमधील घरातून ताब्यात घेतले आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात गायब असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आणखी किती जणांच्या जमिनी बळकावल्या
या टोळीने आणखी किती जणांच्या जमिनी अशाच प्रकारे बळकावल्या आहेत, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन मुख्य आरोपींना अटक झाल्याने या रॅकेटमधील इतर साथीदारांचे धाबे दणाणले असून, शिर्डी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.





