Monday, September 7, 2026
HomeनगरShirdi : शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात कल्पना खरात यांची चौकशी?

Shirdi : शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात कल्पना खरात यांची चौकशी?

पती अशोक खरात यांनी जमीन व्यवहार केल्याचा दावा || पोलिसांकडून जबाब नोंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

परिसरातील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात गुरुवारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी कल्पना अशोक खरात या शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्याचे तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार त्या तपास प्रक्रियेत सहभागी झाल्याचे नमूद केले जात आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविल्याची माहिती आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, चौकशी दरम्यान कल्पना खरात यांनी संबंधित जमीन व्यवहारात आपली कोणतीही थेट भूमिका नसल्याचा दावा केल्याचे समजते. रावसाहेब गोंदकर यांच्याकडून झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराची संपूर्ण प्रक्रिया त्यांचे पती अशोक खरात यांनी हाताळली असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

व्यवहारातील निर्णय, कागदपत्रांची प्रक्रिया तसेच इतर बाबींची माहिती आपल्याकडे नव्हती, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. तसेच संबंधित व्यक्तींशी आपला कोणताही संपर्क नसल्याचा दावा त्यांनी केल्याचेही तपास यंत्रणांच्या माहितीनुसार समोर आले आहे. शिर्डीलगत निघोज परिसरातील गट क्रमांक 106/2 मधील सुमारे चार एकर जमिनीच्या व्यवहारावरून हे प्रकरण उद्भवले आहे. या व्यवहारात फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक कारवाईनंतर अशोक एकनाथ खरात, कल्पना अशोक खरात यांच्यासह काही इतर व्यक्तींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधितांनी संगनमत करून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. दरम्यान, कल्पना खरात यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादात जमीन व्यवहारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा दावा करण्यात आल्याचे समजते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. या आदेशानुसार त्या शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आणि तपास अधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदविला, असे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येते. या प्रकरणात पोलिसांनी राहाता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याचीही माहिती समोर आली आहे.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर कल्पना खरात पोलीस ठाण्याबाहेर आल्या, अशी माहिती आहे. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले आणि कोणतेही अधिकृत भाष्य न करता त्या निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, कल्पना खरात यांनी चौकशीदरम्यान केलेले दावे आणि तपास यंत्रणांकडे उपलब्ध असलेले पुरावे यांची पडताळणी सुरू असल्याचे समजते. जमीन व्यवहारात त्यांची भूमिका नेमकी काय होती, तसेच संबंधित व्यवहाराची माहिती त्यांना होती की नाही, याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२६ – उच्चस्तरीय समितीची कठीण ‘परीक्षा’

0
महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरती परीक्षांमधील सातत्याने समोर येणारे गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे सत्र थांबवण्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या...