शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारी साईबाबांची शिर्डी गेल्या काही वर्षात संवेदनशील बनली आहे. शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे 114 तर 12 सराईत गुन्हेगार आहेत. यातील 13 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. यातील दोघांचा तडीपारीचा कालावधी संपला आहे. अनेकजण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नाहीत. हद्दपार कारवाईतील उर्वरित नऊ जणांपैकी पाच जण बेकायदेशीरपणे शिर्डीत राहत होते. त्यांना पोलिसांनी गेल्या आठवडाभरात अटक केली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीला तो हद्दपारीच्या काळात वास्तव्य करणार असलेल्या पोलीस ठाण्यात रोज किंवा आठवड्यातून ठराविक दिवशी हजेरी द्यावी लागते.
पोलिसांनाही त्याच्यावर लक्ष ठेवावे लागते मग हद्दपारीत आरोपी आपल्याच घरी बिनधास्त कसे राहतात हा सामान्य नागरिकांना पडलेला भाबडा प्रश्न आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या दुहेरी हत्याकांडातील 1 आरोपी हद्दपार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिर्डीत बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्न करत असूनही काल, मंगळवारी पुन्हा एकावर चाकूहल्ला झाला. या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठ्या कारवाया अपेक्षित आहेत. शिर्डी शहरात अजून 13 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव पोलीस आणि महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत.
सध्या शहरातील दोन जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे, तर एकावर कारवाई प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त, बाहेरच्या ठिकाणांहून हद्दपार केलेले चारजण शिर्डीत वास्तव्यास होते. त्यातील तिघांची मुदत संपली आहे. बेकायदेशीर किती असतील त्याची गणती नाही. शिर्डीत स्थानिक नागरिक व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता पोलिसांनी यापुढे बाहेरचे कोणतेही हद्दपार गुन्हेगार शिर्डीत स्वीकारू नये, अशी मागणी शिर्डीकरांनी केली आहे.