Sunday, May 10, 2026
HomeनगरAshok Kharat : भोंदू खरातचा 'पतसंस्था' गेम! ३२ बोगस खात्यांतून कोट्यवधींची माया...

Ashok Kharat : भोंदू खरातचा ‘पतसंस्था’ गेम! ३२ बोगस खात्यांतून कोट्यवधींची माया लंपास

शिर्डी (प्रतिनिधी)

स्वतला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू खरात याच्या काळ्या साम्राज्याचा आणखी एक धक्कादायक पदर शिर्डी पोलिसांच्या तपासात उलगडला आहे. सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्थेत खरातने चक्क ३२ लोकांच्या नावे बेनामी खाती उघडून तब्बल २ कोटी ७४ लाख रुपयांची उलाढाल केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नावे ही खाती होती, त्यांना या व्यवहाराची पुसटशी कल्पनाही नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने खरातच्या ‘मनी लाँड्रिंग’च्या संशयाला बळ मिळाले आहे.

- Advertisement -

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शुक्रवारी सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा जबाब नोंदवला. या जबाबातून खरातच्या अजब कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला. खरातने २०१६ ते २०२३ या काळात आपल्या नातेवाईकांच्या आणि परिचितांच्या नावे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. या सर्व ३२ खात्यांचा रिमोट कंट्रोल स्वतः खरातच्याच हातात होता. २०२४ मध्ये व्याजासह ही रक्कम २ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आणि खरातने ‘वारस’ म्हणून सर्व रक्कम काढून घेत पोबारा केला. सध्या या पतसंस्थेत खरातचा एकही रुपया शिल्लक नाही.

दुसरीकडे, ज्या खातेदारांच्या नावे हे व्यवहार झाले, त्यांनी पोलिसांसमोर दिलेला जबाब अधिक धक्कादायक आहे. “आम्ही कधी पतसंस्थेत गेलोच नाही, कागदपत्रे दिली नाहीत आणि स्वाक्षरीही आमची नाही,” असे या खातेदारांनी स्पष्ट केल्याने खरातने बोगस कागदपत्रांच्या आधारे हा सर्व ‘गेम’ केल्याचे स्पष्ट होत आहे.


केवळ पतसंस्थाच नव्हे, तर जमिनीच्या व्यवहारातही खरातने आपला हात साफ केला आहे. शिर्डीतील एका शेतकऱ्याला दोन टक्के व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखवून बोलावले आणि ऐनवेळी कर्जाऐवजी जमिनीची थेट खरेदीच करून घेतली. या व्यवहारात करण्यात आलेला सामंजस्य करार देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, भोंदू बाबाच्या या आर्थिक चक्रव्यूहात आणखी किती जण अडकले आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पतसंस्थेच्या व्यवस्थापकांनी सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात खातेदारांच्या अज्ञाताने या प्रकरणाला आता गंभीर वळण दिले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...