नवी दिल्ली | New Delhi
‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, शिवप्रेमींची मोठी आणि उत्साही उपस्थिती, ढोलताशांचा गगनभेदी गजर, शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या, मस्तकी विलसणारे भगवे फेटे, भारतीय सेनेची अनोखी मानवंदना, अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती आज देशाच्या राजधानीत मोठ्या उत्साहात साजरी झाली.
दिल्लीतील (Delhi) शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती आपल्या परिवारासह उपस्थित होते. मेजर जनरल एस एस पाटील (विशिष्ट सेवाचक्र) यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र सदनाच्या मुख्य प्रवेश भागातील मध्यस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. येथे आयोजित विशेष कार्यक्रमात शिवजन्मोत्सवानिमित्त संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पाळणा पूजन करण्यात आले.
त्यानंतर पालखी पूजनही झाले. सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार आदींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी तसेच दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्र सदनाचा (Maharashtra Sadan) परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
ढोल ताशांचे सादरीकरण
नाशिकच्या ढोल ताशांच्या पथकानेही या कार्यक्रमात सादरीकरण केले. या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. ढोल पथकातील सहभागी तरुणाईचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मानवंदनाच्या कार्यक्रमानंतर .सदनाच्या सभागृहात ‘द फोक’ आख्यान खड्या आवाजात सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आख्यान भिडणारे असे होते. संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे व माजी खासदार हेमंत गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. येथेही ढोलताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.