मुंबई | Mumbai
राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी नाराज असून ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत आणि निवडणूकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात आहे. यासोबतच कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. महिनाभरात राजन साळवी पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिनाभरात राजन साळवी याबाबत निर्णय घेणार आहेत. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत राजन साळवी यांनी मंगळवारी सांगितले होते की, ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कामे मी आजपर्यंत केली आहेत. त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे.’, असे सांगितले होते. पण आता जिल्ह्यामध्ये ते ठाकरे गटाला रामराम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. पण, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात पडलेली फूट, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कोकणात ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील फुटीनंतर ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळवी यांना शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांच्याकडून पराभवाच धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटालाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आता राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
राजन साळवी ठाकरे गटाचे कोकणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. नगरसेवक, नगराधयक्ष, जिल्हाप्रमुख, ३ वेळा आमदार आणि आता ते ठाकरे गटाचे उपनेते आहेत. सराकरने त्यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेतली त्यामुळे सध्या ते खूपच नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर त्यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यांना निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी फक्त एकच पोलिस दिला आहे. त्यामुळे माझं काही बरे वाईट झाले तर याची जबाबदारी सरकारची राहिल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
साळवींवर काय आरोप?
माजी आमदार राजन साळवी यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची मुळ संपत्ती अंदाजे २ कोटी ९२ लाख रुपये इतकी आहे. ऑक्टोबर २००९ ते २०२२२ पर्यंत १४ वर्षांच्या कालावधीत बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा ११८ टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.