नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाल्याची चर्चा होती. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार शिंदे शिवसेनेच्या गळाला लागल्याचे बोलले जात होते. असे असतानाच शिंदे गटाच्या एका खास मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिंदे सेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला चक्क शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन बड्या खासदारांनी हजेरी लावली.
शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील घरी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. यात नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले काय? अशी चर्चा रंगली होती.
गेल्यावर्षी सु्द्धा आष्टीकर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पक्ष वेगळे झाले तरी मित्र असल्याने त्यावेळी हजेरी लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वेळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की “कुणीही खासदार नाराज नाही. प्रतापराव जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. जाधव यांच्याकडून स्नेहभोजनासाठी निमंत्रम आल्याने आम्ही गेलो होतो. आम्ही काही केले नाहीतर, भीती कशाला बाळगली पाहिजे. त्यामुळे फोटो सोशल मीडियावर टाकले. आम्ही लपवून गेलो नाही. शुभेच्छा दिल्यानंतर फोटो काढणार. मला काही गैर वाटत नाही. भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही.मला वाटतं सुख-दुख:त एकमेकांना भेटले पाहिजे. एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ”
“उद्धव ठाकरे आमच्याशी बोलतात. आमच्या संपर्कात असतात. आम्ही वाटेल तेव्हा त्यांना जाऊन भेटतो,” असेही नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले.
शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी खासदारांवर विश्वास असल्याचे म्हटले होते. तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात होते. या बैठकीत मोठी खडाजंगी झाल्याच्या चर्चा आहे. तर या बैठकीला कोण खासदार गैरहजर होता आणि तो का गैरहजर होता यावरून चर्चांना उधाण आले आहे. त्यातच दिल्लीतील डिनर डिप्लोपसी शिंदे सेनेच्या पथ्यावर पडते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.





