नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज उद्धव ठाकरेंच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला असून, आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला असलेल्या अधिकारांबाबत युक्तिवादारदम्यान मोठे भाष्य केले आहे. आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांनाच नाही, न्यायालयही काही प्रकरणांमध्ये आमदारांना अपात्र करू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार गेले होते. याच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन आणि राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गणेश मंडळांना मोठा दिलासा! सहा फुटांवरील पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय
विधानसभा अध्यक्षांनी ही केस योग्य प्रकारे हाताळली नाही. आमदारांनी मूळ पक्षातून फुटण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला होता, ते सगळे आमदार हे अपात्र ठरायला हवे होते, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी चुकीचे निर्णय दिल्यानंतर ते निर्णय अनेकदा न्यायालयाने फिरवल्याचे अनेक दाखले देवदत्त कामत यांनी दिले.
या आमदारांनी ज्या दिवशी पक्षांतराची कृती केली, त्याच दिवसापासून त्यांची अपात्रता लागू झाल्याचा कायदेशीर निष्कर्ष न्यायालय देऊ शकते, असा मुद्दा कामत यांनी मांडला. अपात्रतेचा निर्णय उशिरा झाल्यामुळे संबंधित आमदारांनी पक्षांतरानंतरचे राजकीय फायदे आधीच घेतले, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
निवडणूक आयोगाने विधिमंडळ बहुमताच्या आधारे शिंदेंच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिले. मात्र पक्षांतरबंदीच्या कायद्यान्वये ते सगळेच आमदार अपात्र ठरतात. त्यांनी पक्षत्याग जरी केला असला तरी ते अपात्र न ठरता, चिन्हाच्या आधारे लाभ उपभोगत आहेत. ते चिन्ह त्यांना मिळाले ते फक्त विधिमंडळातील बहुमताच्या आधारे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी त्यावेळी पक्षत्याग केला की नाही याचा कायमचा निर्णय घ्यावा. त्यांनी जर पक्षत्याग केला असेल हे सिद्ध झाले तर आजही न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकते आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आधारच निष्ट होईल, असा मोठा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.




