नवी दिल्ली | New Delhi
दिल्लीत आप आणि काँग्रेसचा (AAP and Congress) झालेला पराभव आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांचा शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते दिल्लीत झालेल्या सत्कारानंतर राज्यातून घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील मित्र असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने वेगाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे हेही तत्काळ दिल्लीला (Delhi) रवाना झाले असून त्यांनी काल रात्री (१२ फेब्रुवारी) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला असता विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, “काल रात्री राहुल गांधींची भेट घेतली. आज अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहे. वोटर फ्रॉड आणि ईव्हीएम फ्रॉडमुळे आपली मते कुठे जात आहेत हे कळत नाही. आपण लोकशाहीत राहतो असं आपण भासवत आहोत, हे भासवणं दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. शिवसेना, आप किंवा काँग्रेससोबत जे झालं, ते उद्या कदाचित बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबत होईल, आरजेडी, चंद्राबाबू यांच्याबरोबरही होईल. भाजपा प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची (BJP) सत्ता स्थापन करेल”, अशी भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.
पुढे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या केलेल्या सत्कारावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,” कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्याचा विषय आहे. त्याला संजय राऊत यांनी काल उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबतच नाही तर महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली आहे. तसेच अनेक लोकं पक्ष फोडतात. पण राग या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. त्यांनी दिलेलं नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं आहे. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे पाप त्यांनी केले आहे”, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच पुढील रणनीती म्हणून इंडिया आघाडीसाठी वरिष्ठ नेते रोडमॅप तयार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.