शेगाव – प्रतिनिधी
शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० हून. अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तिन्ही गावातील अनेक व्यक्तीची केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत.यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे सर्वेक्षण झाले आहे व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे. या आजारामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत.