बीड | Beed
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस(शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी खळबळजनक आरोप केला. सोमवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीनंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांची सोमवारी सामुहिक बैठक झाली त्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्वात म्हणजे मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी आता पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा पोलिसांचा कट होता. धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
महिलेसोबत अवैध संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. यासाठी कळंबमध्ये एक महिलाही तयार ठेवली होती. पण, गावातील तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि डाव उलथून लावला, असा खळबळजनक दावा ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांनी काय आरोप केला
खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे, मेहबुब शेख यांनी मंगळवारी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण हत्याप्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेतला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचा देशमुख यांचा मृतदेह असलेली अँब्युलन्स कळंबमध्ये एका महिलेच्या घरी नेण्यात येणार होती. पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला. त्या महिलेच्या घरी मृतदेह टाकून हत्या अनैतिक संबधांतून झाली असे दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, असे देखील गावकरी म्हणाले.
काय होता पोलिसांचा कट?
धनंजय देशमुखांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, संतोष आण्णांना दवाखान्यात न्यायचे आहे, असे एका सहकाऱ्याने फोनवर सांगितले. पण पोलिसांनी त्यावेळी काय घडले, याची माहिती कुणालाही लागू दिली नाही. संतोष देशमुखांना घेऊन जाणारी अँब्युलन्स अचानक कळंबच्या दिशने निघाली. केजमध्ये रुग्णालय आणि पोलिस स्टेशन असूनही कळंबच्या दिशेने अँब्युलन्स का नेली जात आहे, असा प्रश्न त्यावेळी तरुणांना पडला. संशय आल्यामुळे तरुणांनी त्या अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला.
कळंबमध्ये बाई तयार ठेवली होती
कळंबमध्ये एक महिलेला तयार ठेवण्यात आल्याचे आणि आणि हत्येला वेगळे वळण देण्याचा कट असल्याचा आरोप सुरेश धस यांनी सभागृहात केला होता. माणसांना मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे हे आरोपींचे काम. त्यांनी कळंबमध्ये एका महिलेले पैसे देऊन तयार ठेवले असायचे. मग छेडछाडीतून त्या व्यक्तीला मारण्यात आल्याचे चित्र निर्माण करायचे आणि त्यानंतर ती महिला विनयभंगाची केस करायची. असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे. या प्रकरणात कुठे केस दाखल करुन घेतली जायची नाही. उलट समाजातून त्या व्यक्तीला उठण्याची वेळ यायची. समाजासाठी लढणाऱ्या होतकरू तरुणाला बदनाम करण्याचा पोलिसांचा आणि आरोपींचा कट होता, असा आरोपही धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा