येवला | प्रतिनिधी Yeola
७/१२ उताऱ्यावरील एमआयडीसीचा (MIDC) बेकायदेशीर शिक्का तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज, धरणे आंदोलन केले. तर प्रांतअधिकारी उपलब्ध नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले.
मनमाड नजीक असलेल्या मौजे अनकवाडे आणि मौजे सटाणा येथील शेतजमिनींवर प्रशासनाकडून एमआयडीसीचा शेरा मारण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कोणतेही व्यवहार करता येत नाहीत किंवा कर्ज काढताना अडचणी येत आहेत. हा शेरा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लावण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दुपारी १ बाजेच्या सुमारास धरणे आंदोलनाला सुरुवात झाली, साडे तीन वाजेच्या सुमारास आंदोलनकर्ते काही शेतकरी प्रांताधिकारी कार्यालगतच्या पाण्याच्या टाकीवर चढले. मात्र, या प्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन निवासी नायब तहसीलदार हिरा हिरे यांनी दिल्यानंतर पाच बाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. भविष्यात जर आमच्या शेतीतील एक इंच जागाही घेतली तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेला एमआयडीसीचा शेरा तात्काळ रद्द करण्यात यावा, ज्या अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने हे शिक्के मारले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर यावेळी मांडल्या. संबंधित महसूल आणि एमआयडीसीचे अधिकारी हे ठराविक राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहेत.
शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा डाव असून, लोकशाही मार्गाने दिलेला हा लढा आता तीव्र करण्याचा निर्धार यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी केला. तर प्रशासनाने आमच्या ७/१२ वरील नोंदी तातडीने दुरुस्त केल्या नाहीत, तर आम्हाला टोकाचे पाऊल उचलावे लागेल. सर्व शेतकरी मिळून सामूहिक आत्मदहन करू, ज्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल,” असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार, पी. आर. निळे, अनिल गुंदेचा, निलेश चुणूके, शौकत शेख, प्रशांत कातकडे, कल्याण माकूने, शामराव शिंदे, जयवंत जाधव यांच्यासह अनकवाडे आणि सटाणा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





