अकोले |प्रतिनिधी| Akole
वीज वितरणच्या विद्युत तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तीन शेतकर्यांच्या उसाच्या शेताला भीषण आग लागून सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 26) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे घडली. या आगीत शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उंचखडक बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र असून, शेतांमध्ये छोटे बांध आणि अरुंद रस्ते आहेत. त्यातच बुधवारी सकाळी वार्याचा वेग अधिक असल्याने आग झपाट्याने पसरली. त्यामुळे आग आटोक्यात आणताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, गावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला. यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा तीन एकर, रामनाथ पाचपुते यांचा दोन एकर, तर जगन्नाथ देशमुख यांचा एक एकर ऊस जळाला आहे.
आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना शेतकर्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शॉर्टसर्किटमुळे उभा ऊस जळून खाक झाल्याने संबंधित शेतकर्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे वीज वितरणच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाने घटनेची चौकशी करून विद्युत तारांची व यंत्रणेची पाहणी करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




