पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
नाशिकचे ग्रामदैवत प्रभू श्री रामचंद्र व गरुड रथाला सुमारे २५० जुनी वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक रामरथ यात्रेने रविवार दि.२९ रोजी नाशिककरांच्या डोळ्यांनी पारणे फिटले. सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय, जय सीता… राम सीता अस्त जयघोष करीत शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम व गरजर मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगली. यामुळे शहरात उत्सवाचे वातावरण होते.
श्रीरामनवमी आणि त्यानंतर चैत्र कामदा एकादशीस येणारा नाशिकचा ग्रामोत्सव म्हणजे श्रीराम आणि गरुड रथोत्सव हा नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा भाग आहे. रविवार दि.२९ रोजी दुपारनंतर रथोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या नरेंद्रबुवा पुजारी यांना पांढरा फेटा बांधण्यात आला. परंपरेनुसार असणारे मानकरी रवींद्र दीक्षित यांच्या वाड्यात जाऊन परंपरेनुसार त्यांना मानकरी निमंत्रण देण्यात आले. मानकरी नरेंद्रबुवा पुजारी यांना तेथे पारंपरिक गंधलेपन आणि पूजन करून मानकरी जाऊन विनंती करतात आणि पूजन करण्यात आले.त्यानंतर काळाराम मंदिराच्या आवारात श्री काळाराम संस्थांच्या अध्यक्ष न्यायाधीश रेखा पांढरे विश्वस्त राघवेंद्र पुजारी, प्रतिक पुजारी, शुभम मंत्री , शांताराम अवसरे ,अँड.अक्षय कलंत्री,मिलिंद तारे,कौशिक कोठिया,अमित कोठावदे,यांच्या उपस्थितीत श्रीराम पंचायतनाची महापूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर नारळ फोडून त्यानंतर आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली.
श्रीराममूर्ती चांदीच्या पादुका हातात घेऊन मानकरी नरेंद्रबुवा पूजाधिकारी यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मूर्ती चांदीच्या पालखी ठेवली. त्यानंतर कहार मंडळींनी परंपरेनुसार पालखी पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणली त्या ठिकाणी पालखी येताच उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष केला.त्यानंतर महाआरती करून भोग मूर्ती श्रीराम रथामध्ये ठेवण्यात आल्या.
यावेळी रामरथ आणि गरुडरथ दोन्ही समांतर उभे केले त्या ठिकाणी आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर गरुडरथ ६:३० वाजता तर रामरथ ६:५० वाजता पुढे निघाला. रथाच्या पुढे सनई चौघडा ढोल ताशांचे पथक होते. तर मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे निघाले होते. रामरथ आमदार अँड.राहुल ढिकले यांच्या घराजवळ गेल्यावर आमदार.अँड.राहुल ढिकले, त्यांचे चिरंजीव आर्यन आणि शौर्य यांनी पूजा केली.यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघा पंचवटी परिसर रामनामात न्हाऊन निघाला.
रथावर खा.राजाभाऊ वाजे, स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास , सुधीरदास महाराज,नगरसेवक कमलेश बोडके, सुरेश आण्णा पाटील, सुनील बागुल, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील,मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील उपस्थित होते.यावेळी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांसह नाशिककर भाविकांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती, यावेळी रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती,
रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनई चौपाला, दांत्र, बोल-ताशे वाजवून वातावरण भक्तिमय केले जात होते. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रथाचे स्वागत करण्यात येत होते, संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता, रथमार्गावरील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संपूर्ण पंचवटी परिसर रामभक्तीने ओसंडून वाहत होता. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी दोन्ही रथावरून चंदन पुजारी आणि नंदकुमार मुठे हे नागरिकांना सूचना करत होते. यावेळी अनेक नागरिक हे आपल्या मोबाईल फोनमध्ये सेल्फी घेत व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसत होते. रथाच्या मार्गावर विविध मंडळांनी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते.श्रीराम रथ जस जसा पुढे सरकत होता तस तशी गर्दी देखील वाढत होती. रथाचे ठीक ठिकाणी पूजन आणि आरती करण्यात येत होती. तसेच फुलांची उधळण केली जात होती.गरुडरथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला.तर श्रीरामरथ नदीपार करत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरीपटांना वर आगमन झाले असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दोन्ही रथांचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृतपूजा, पंचामृत ,अभ्यंगस्नान अवभृतस्नान आणि महापूजा करण्यात आली.
रथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, श्री अहिल्याराम व्यायाम शाळा, रोकडोबा तालीम संघ, गुलालवाडी व्यायाम शाळा ,ओकाची तालीम संघ,मोहन मास्तर तालीम संघ, यशवंत व्यायाम शाळेचे मलपट्टू आदी ठिकाणचे पैलवान पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहान मुलांसह भाविकांनी विशेषतः महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दुपारपासूनच पंचवटीतील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.
गरुडरथाचे मार्गक्रमण
काळाराम मंदिर पूर्व दरवाजा,नागचौक हत्तीपूल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, रोकडोबा मारुती, नेहरू चौक, वंदे मातरम चौक, मेनरोड, बोहरपट्टी, सराफ बाजार, कापड बाजार, बालाजी कोट, कपूरथाळा मैदान,गाडगे महाराज पूल, रामसेतु, सरदार चौक , अहिल्याराम व्यायाम शाळा, रामकुंड, अवभृत स्नान , पूजा विश्रांतीनंतर कपालेश्वर मालवीय चौक, शनीचौक, कार्तिक स्वामी मंदिर, उत्तर दरवाजा काळाराम मंदिर असे होते.
गरुड रथाची कापडपेठेतील श्री व्यंकटेश बालाजी मंदिराची आरती व त्याची परंपरा
काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना बालाजी मंदिर येथील सत्पुरुष तिमय्या महाराज यांच्या हस्ते करावी असा दृष्टांत ज्यांनी मंदिर बांधले त्या सावकार ओढेकरांना झाला. त्याप्रमाणे तिमय्या महाराज यांनी देवाज्ञा मनात गर्भगृहात मूर्ती स्थानापन्न केल्या. ते करण्यासाठी त्यांच्या हातात असलेली जपाची माळ व काठी तेथेच ठेवली. आजही ही माळ व काठी प्रभू श्री रामचंद्रांच्या गर्भगृहात आहे. श्रीराम नवमीचा उत्सव झाल्यावर कामिका एकादशीला अवभृत स्नानासाठी श्रीराम मंदिरातून रथाची मिरवणूक निघते. मात्र नाशिक येथे प्रभू श्रीराम हे वनवासात होते. त्यामुळे ते नदी ओलांडत नाहीत. म्हणून श्रीराम मंदिरातून दोन रथ निघतात. पुढे गरुडाचा रथ असतो, त्यात मारुतीची मूर्ती असते हा रथ नदी ओलांडून कापड पेठेतील बालाजी मंदिराची आरती घेण्यासाठी म्हणून गावात येतो. येथे विधिवत देवाची आरती बालाजीवाले कुटुंबियांना तर्फे केली जाते. या रथाला केलेली आरती हि रथाच्या नाडा मंदिराच्या पायरीला स्पर्श करून स्वीकारली जाते. रथ पुढे मार्गक्रमण करून रामरथापाशी जातो. त्यानंतर गरुड रथाचा नाडा रामरथाला लावला जातो आणि बालाजीतली आरती या पद्धतीने रामरथाला अर्पण केली जाते. या रथ मिरवणुकीची खासियतच बालाजी मंदिराची आरती आहे. शेकडो वर्षापासून आजही दोन्ही कुटुंबांकडून या परंपरेचा आदर राखला जातो. दोन्ही देवस्थानांमधला असलेला हा सेवाभाव व आदराचा दुवा म्हणजेच गरुड रथाची आरती होणे व ती रामरथाला अर्पण करणे असे आहे .
चोख बंदोबस्त
मिरवणूक मार्गावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ १ मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील,उमेश पाटील, विश्वास पाटील,अशोक शेरमाळे, सुनील पवार वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी , महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड ,राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





