Monday, November 23, 2026
HomeनगरAhilyanagar : श्री संत माऊली सोसायटीचा चेअरमन शिरसाठ अटकेत

Ahilyanagar : श्री संत माऊली सोसायटीचा चेअरमन शिरसाठ अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून घेतले ताब्यात || पाच दिवसांची पोलीस कोठडी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बचत खात्यावर आणि मुदत ठेवींवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाठ (वय 26, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याला अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुनील शिरसाठ आणि संचालक मंडळाने नागरिकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले होते. जाहिराती तसेच प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून बचत खाते उघडल्यास आणि मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवल्यास जादा व्याज मिळेल, असे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी सोसायटीमध्ये पैसे जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांनी आपल्या खात्यांवरील रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना वेळोवेळी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, गोल्ड लोनअंतर्गत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने परत न देऊनही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे ठेवीदार आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव आणि नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव, देडगाव आदी ठिकाणी शाखा होत्या. या शाखांच्या माध्यमातून संबंधित भागांतील नागरिकांनी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चेअरमन सुनील शिरसाठ पसार झाल्यानंतर त्याच्याविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने तपास अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस शिरसाठचा शोध घेत असताना तो नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला. आयुक्त कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना आवश्यक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक पोलिसांनी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये जाऊन शिरसाठला ताब्यात घेण्याची कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक गणेश उगले आणि पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ कोठुळे करीत आहेत.

गॅलरीतून आत्महत्येची धमकी
चेअरमन सुनील शिरसाठ यास अटक करण्यासाठी पोलीस पथक नाशिक उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच शिरसाठने तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीत जाऊन दरवाजा बंद केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे पोलिसांसमोर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याचे आव्हान उभे राहिले. पोलिसांनी घाई न करता प्रसंगावधान राखले आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या मदतीने शिरसाठची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या कारवाईत दोन्ही जिल्ह्यांतील पोलिसांचा समन्वय महत्त्वाचा ठरला.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने पावले उचलली आहेत. गुन्ह्यातील...