Wednesday, December 4, 2024
Homeनगरफलकासमोरच पडला खड्डा : प्रवासी म्हणतात, कोणाचे आशिर्वाद ?

फलकासमोरच पडला खड्डा : प्रवासी म्हणतात, कोणाचे आशिर्वाद ?

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील विकास कामातील टक्केवारी आणि कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होताच हिरडगाव रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चांगलाच गांगरला आहे. त्याने स्वत:हून नुकत्याच पूर्ण केलेल्या रस्त्यावर मात्र अचानक पडलेले खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचा आणि तालुक्याच्या नेत्यांचा फोटो असणार्‍या फलकासमोर एक भला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात ज्यांची ज्यांची वाहने आदळत होती. त्यांची संबंधित फलकाकडे व त्यावर असणार्‍या फोटोकडे नजर खिळत होती. यामुळे या भागातील नागरिक आणि वाहन चालक असे खड्डेमय रस्त्याचे काम कोणी केले, असा प्रश्न उपस्थित करत होते. हा संपूर्ण तालुक्यात चर्चाचा विषय बनला होता.

- Advertisement -

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने कोट्यवधीचा निधी मंजूर केला असून त्याची जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे. मात्र, हे करत असताना होणार्‍या कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. नेते आणि त्यांचे निकटवर्तीय टक्केवारीच्या जाळ्यात अडकले असल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत ‘सार्वमत’ने वाचा फोडताच अनेक ठेकेदारांचे डोळे उघडले आहेत. त्यांनी रस्त्यांसह अन्य विकास कामांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी तर ठेकेदार स्वत:हून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील एका रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून त्याठिकाणी कामाचा फलक लावलेल्या ठिकाणासमोरील रस्त्यावर खड्डा पडलेला होता. त्या फलकावर तालुक्यातील नेत्याचा फोटो होता.

पडलेल्या खड्ड्यात वाहन आदळल्यानंतर खड्ड्यापेक्षा अधिक त्याठिकाणी असणार्‍या फलकासह त्यावर असणार्‍या फोटोकडे प्रवासी आणि वाहन चालकांचे लक्ष जात होते. नेत्यांच्या आशिर्वादाने हे खड्डे पडल्याची भावना यावेळी अनेक अनोळखी वाटसरूंनी व्यक्त केली. दुसरीकडे तालुक्यातील बंधारे, गावागावांतील छोटे, मोठे सभागृह, शाळांच्या खोल्या, जिल्हा आणि ग्रामीण मार्गाच्या सुरू असणार्‍या कामाच्या दर्जावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. मतदारसंघात कामांचा गाजावाजा सुरू आहे. पण गुणवत्तेचे काय? ते कोण पाहणार? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत. मतदारसंघातील नगर तालुक्यातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर एका नेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून प्रश्न उपस्थित केला आहे. ही परिस्थिती मतदारसंघात सर्वत्र सारखी असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महायुतीने सरकारने मंजूर केलेल्या कामांसोबतच्या गुणवत्तेची माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या