Sunday, July 21, 2024
Homeनगरश्रीगोंदा जिलेटीन स्फोटातील फरार ठेकेदार जेरबंद

श्रीगोंदा जिलेटीन स्फोटातील फरार ठेकेदार जेरबंद

विहिरीत स्फोट होऊन तिघांचा मृत्यू, तीन जखमी झाल्याची घटना

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथिल विहीर कामात जिलेटीन होलमध्ये भरताना झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. याप्रकरणी विहिरीचा ठेकेदार संजय शामराव इथापे यांच्यावर मृत्यूस कारणीभूत झाले. प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु तेव्हापासून फरार असलेल्या इथापे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथून सापळा रचून जेरबंद केले.

संजय शामराव इथापे (रा. टाकळीकडेवळीत, ता.श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. या घटनेत नागनाथ भालचंद्र गावडे (29, रा. बारडगाव ता.कर्जत) व सुरज उर्फ नासीर युसूफ इनामदार (25), गणेश नामदेव वाळुंज (25, सर्व रा. टाकळीकडेवळीत, ता.श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर वामन गेणा रणसिंग, रवींद्र गणपत खामकर, जब्बार सुलेमान इनामदार (सर्व रा. टाकळीकडेवळीत ता. श्रीगोंदा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी (दि.15) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ठेकेदार संजय शामराव इथापे याने कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसताना व ब्लास्टींग करणारे प्रशिक्षित (डिलर फायर) उपलब्ध नसताना, तसेच स्फोटक पदार्थ वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना, मजुरीवर काम करणारे जब्बार इनामदार, सुरज ऊर्फ नासीर इनामदार, गणेश वाळुंज, नागनाथ भालचंद्र गावडे यांना विहिरीमध्ये ब्लास्टींग ट्रॅक्टरच्या मशीन ने व्होल करून त्यामध्ये ब्लास्टींगचे जिलेटीन कांड्या भरण्याकरिता प्रवृत्त केले. हे कामगार विहिरीमध्ये व्होल करून ब्लास्टींगचे जिलेटीन कांड्या व्होलमध्ये भरण्याचे काम करत असताना विहिरीमध्ये मोठा स्फोट झाला.

आत काम करणारे चौघेही स्फ़ोटाच्या दणक्याने विहिरीच्या बाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडले. यात सुरज इनामदार, गणेश वाळुंज, नागनाथ गावडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांच्या मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत झाल्यावरून शामराव इथापे याचेविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून इथापे फरार झाला होता. त्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा शोध सुरू होता. त्याचे कुटुंबीय, मित्रांकडे शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो पुण्यातील हडपसर भागात असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने हडपसर येथे सापळा रचून त्यास शिताफीने जेरबंद केले.

ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे, उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, रवींद्र घुंगासे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने पार पाडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या