Friday, August 21, 2026
Homeक्राईमCrime News : श्रीगोंद्यात रस्ता लुट करणारे तिघे गजाआड

Crime News : श्रीगोंद्यात रस्ता लुट करणारे तिघे गजाआड

सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश || स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील वडाळी परिसरात युवकाला अडवून गुप्तीचा धाक दाखवत दागिने आणि मोबाईल हिसकावून घेत रस्ता लुट करणार्‍या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या कारवाईत तब्बल 11 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.
अनिकेत उकांडे (वय 26 रा. अकोळनेर, ता. नगर), प्रथमेश शिंदे (वय 22 रा. शिवाजी चौक, श्रीगोंदा), विजय देशमुख (वय 30 रा. नळवणे, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

- Advertisement -

8 ऑक्टोबर रोजी रात्री कार्तिक मिसाळ (वय 20, रा. खेडकर मळा, श्रीगोंदा) हे वडाळी रस्त्यावरील लोखंडे मळा टेकडी परिसरातून जात असताना, एक स्विफ्ट कार आडवी लावून अज्ञात इसमांनी गुप्तीचा धाक दाखवून 2 लाख 80 हजार रूपये किमतीचे दागिने व दोन मोबाईल लुटून नेला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होती. त्यासाठी पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महिला अंमलदार चिमा काळे आणि चालक अरूण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन घेतले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची माहिती गोळा केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, हा गुन्हा प्रथमेश शिंदे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाला संशयित आरोपी पारगाव फाटा (श्रीगोंदा) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून कारवाई करताच दोन कार अडवून संशयित अनिकेत उकांडे, प्रथमेश शिंदे, विजय देशमुख यांना ताब्यात घेतले. यापैकी प्रथमेश शिंदेने कबुली दिली की, हा गुन्हा त्याने आपली मैत्रीण मयुरी आनंदा पाटील (रा. नातोशी, ता. पाटण, जि. सातारा) आणि साथीदार बंडु उर्फ सागर साळवे (रा. बाबुर्डी बेंद, ता. अहिल्यानगर) तसेच प्रतीक धावडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तांदळी दु, ता. श्रीगोंदा) यांच्या मदतीने केला आहे. ते तिघे पसार आहेत.

तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार
संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात यापूर्वीही रेल्वे अ‍ॅक्ट, विनयभंग, गंभीर दुखापत यांसारखे गुन्हे नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहेत. अनिकेत उकांडे याच्यावर दौंड रेल्वे, विजय देशमुख याच्यावर दौंड पोलीस ठाणे व बंडु उर्फ सागर साळवे याच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर संशयित आरोपींना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २१ ऑगस्ट २०२६ – कर्तव्यकठोरता अन् विवेकाचा समतोल हवा

0
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात भेसळखोर, हॉटेल्स आणि मिष्टान्न भांडारांमधील अस्वच्छता, दूषित पाणी आणि अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू केलेली धडक मोहीम ही...