अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि अनधिकृत स्टोन क्रशरविरोधात महसूल प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळ अंदाज समितीच्या जिल्हा दौर्यादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच नगर शहराजवळील कापूरवाडी व वारूळवाडी परिसरातील पाहणीनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील 36 आणि खंडाळा परिसरातील 18, अशा 54 स्टोन क्रशरवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.
संबंधित स्टोन क्रशर चालकांना नोटिसा बजावून क्रशर पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता पुन्हा क्रशर सुरू केल्याचे आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. विधिमंडळ अंदाज समितीचा 6 ते 8 ऑगस्टदरम्यान अहिल्यानगर जिल्हा दौरा झाला. या दौर्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि अनधिकृत स्टोन क्रशरबाबत समितीसमोर तक्रारी मांडण्यात आल्या. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी समितीने कापूरवाडी व वारूळवाडी परिसरातील उत्खननस्थळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान डोंगर पोखरल्याचे तसेच डंपरची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने समितीने नाराजी व्यक्त केली. अवैध उत्खननामुळे परिसरातील जुनी टेकडी सपाट झाल्याची तक्रारही स्थानिकांनी समितीसमोर मांडली. कोट्यवधी रुपयांचा दंड अद्याप वसूल न झाल्याबाबत समितीने गंभीर नाराजी व्यक्त करत, तक्रारीची वाट न पाहता सुमोटो कारवाई करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
उत्खनन आणि स्वामित्वधनाचा ताळमेळ तपासणार
जिल्हाधिकारी कार्यालयात 17 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीतील सूचनांनुसार संबंधित खाणपट्ट्यांची तात्काळ ईटीएस मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित गटातून परवानगीच्या कालावधीत प्रत्यक्ष किती गौण खनिजाचे उत्खनन झाले आणि त्याप्रमाणे शासनाकडे किती स्वामित्वधन जमा करण्यात आले, याचा सविस्तर ताळमेळ तपासला जाणार आहे. याशिवाय संबंधितांना आपला लेखी खुलासा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडील तपासणी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तपासणी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही पूर्तता होईपर्यंत स्टोन क्रशर सुरू करता येणार नाही.
परवानगीशिवाय क्रशर सुरू केल्यास पुन्हा सील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेकडून पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारे क्रशर सुरू ठेवता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय क्रशर सुरू आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकार्यांना देण्यात आले आहेत. ईटीएस मोजणीपासून उत्खननाच्या प्रमाणाचा आणि शासनाला जमा केलेल्या स्वामित्वधनाचा हिशोब तपासला जाणार असल्याने नियमबाह्य उत्खनन आणि क्रशर व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 54 क्रशरवर झालेली कारवाई ही केवळ सुरुवात असून, ईटीएस मोजणी आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर आणखी कोणावर कारवाई होते, याकडे आता नगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.




