
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी पसरत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत, पोलीस उपाधिक्षक जयदत्त भवर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत सविस्तर माहिती दिली. या गुन्ह्यामागे मुंबईहून आलेल्या आरोपींचा सहभाग असल्याची चर्चा तपासात पूर्णपणे निराधार ठरल्याचे त्यांनी सांगितले.
या खूनप्रकरणात केवळ तीन आरोपींचाच सहभाग निष्पन्न झाला असून, तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशयाच्या भोवर्यात असलेल्या अन्य दोन व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही. तसेच, घटनेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी घटनाक्रमाचा बारकाईने तपास केल्यानंतर हा प्रकार जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमांत सुरू असलेल्या टोळीयुद्ध किंवा बाहेरील गुन्हेगारांच्या सहभागाच्या चर्चा या वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री. भवर यांनी केले.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी दिवसभर शहरात विना क्रमांकाच्या वाहनांवर विशेष कारवाई करत अनेक वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय सराईत गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी प्रतिबंधात्मक आणि कठोर कारवाया सुरू असल्याची माहितीही भवर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही भारतीय न्याय संहितेतील (पूर्वीच्या भादंवि) कलम 324 आणि 363 अन्वये गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसरा आरोपी यश जाधव याच्याविरुद्धही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी नागरिकांना केले.




