अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. श्रीरामपूरमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर सविस्तर पोस्ट करत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आ. पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भगवान प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचा कळस झाला असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. तसेच एका हॉटेल व्यावसायिकासह दोन जणांची हत्या झाली आहे. या घटनांमुळे सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या बंदामुळे व्यापार्यांसह सर्वांचेच नुकसान झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पोस्टमध्ये आ. पवार यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीरामपूरातील गुन्हेगारांना नेमके कोणाचे संरक्षण आहे? गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याला सातत्याने याच भागात पोस्टिंग कशी मिळते? एकाच अधिकार्याला आठ ते दहा वर्षे जिल्ह्यात कसे ठेवले जाते? नुकताच निलंबित करण्यात आलेला पोलीस कर्मचारी नेमका कुणासाठी ‘कागद’ गोळा करण्याचे काम करत होता? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगत, गुन्हेगारांच्या पाठीशी कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोस्टच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून आ. पवार यांनी, श्रीरामपूरला भयमुक्त करण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे.




