श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
सलग तिसर्या दिवशी शहरातील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू होते. काल नेहरू मार्केट, पोलीस स्टेशनचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. शहरात अतिक्रमण मोहीम सुरु झाल्यापासून नेवासा रोड, संगमनेर रोड आदी ठिकाणच्या व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपापली अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य केले आहे. अतिक्रमण निघाल्याने शहरातील रस्त्यांनी खर्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. श्रीरामपूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये विदारक चित्र निर्माण झाले आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू आहे. मंगळवारी बेलापूर रोडपासून सुरू झालेली ही मोहीम बुधवारी गोंधवणी रोडवर राबविल्यानंतर काल छत्रपती शिवाजी चौकातून नेवासा रोडवर राबविण्यात आली. काल सकाळी अतिक्रमण मोहिमेचे पहिले लक्ष्य छत्रपती शिवाजी चौकातील भेळीचे दुकान व नेहरू भाजी मार्केट ठरले.
याठिकाणी मार्केटच्या बाहेर असलेले सर्व फ्रुट स्टॉल नामशेष करण्यात आले. त्यामुळे पहिल्यांदा भाजी मार्केटचा घड्याळाचा टॉवर व पूर्ण मार्केट लोकांना पहावयास मिळाले. त्यानंतर पोलीस स्टेशन समोर असलेल्या संपूर्ण गाळ्याची लाईन दोन जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे पोलीस स्टेशनची पूर्ण इमारत सुद्धा लोकांना दिसू लागली. या संपूर्ण भागातील दुकानदार, व्यावसायिक यांचे सर्व गाळे काढून टाकण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासात पोलीस स्टेशनसमोर गाळ्यांची असलेली मागील भिंतीच्या विटा आणि समोरचे पत्रे यांचा खच पडलेला होता.
महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दुपारपर्यंत ही मोहीम जोरात राबविण्यात आली. पुढे एसटी स्टँडकडे जाणार्या रोडवर दुकानदार स्वतःहून आपली अतिक्रमणे काढत असल्याने त्यांना थोडी सवलत देण्यात आली. त्यानंतर पालिकेचा ताफा संगमनेर रोडकडे रवाना झाला. त्या भागात देखील बहुतांश लोकांनी आपली अतिक्रमणे आधीच काढून घेतल्यामुळे कर्मचार्यांना फारसा त्रास झाला नाही. शिवाजी चौक, गुरुनानक मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्टँडपासून पुढे देखील सर्व दुकानदारांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका कर्मचार्यांना त्यांना फारसे सांगावे लागले नाही. गेले तीन दिवस शहरामध्ये सर्व रस्त्यांवर लोकांनी स्वतः केलेली अतिक्रमणे स्वतःच काढत आहेत.
चेहरे झाले सुन्न
गेले तीन दिवस शहरात राबविल्या जात असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक विस्थापित झाले आहेत. अनेकांची दुकाने नेस्तनाबूत झाली आहेत. छोट्या व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व लोकांचे चेहरे सुन्न झाले असून भविष्यामध्ये व्यवसाय कशा पद्धतीने करायचा या विचाराने त्यांना ग्रासले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे.
जलवाहिन्या व गटारीही मुक्त करणार – मुख्याधिकारी
शहरातील जनतेला चांगली सेवा देणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र, अतिक्रमणामुळे आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे फक्त रस्तेच नव्हे तर पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिन्या तसेच ज्या-ज्या गटारींवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे, ते सुद्धा काढले जाणार आहे. जनतेने आपली अशी अतिक्रमणे असतील तर ती स्वतः काढून घेऊन आपले नुकसान टाळावे, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे. काही लोकांनी शहरात पालिकेच्या जागेवर अतिक्रमणे करून टपर्या ठेवल्या आहेत. या टपर्या इतर लोकांना विकल्या जात आहेत. किंवा भाड्याने दिल्या जात आहेत. नागरिकांनी अशा टपर्या घेऊन आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये, अशा प्रकारच्या सर्व टपर्या देखील काढल्या जाणार आहेत, तसेच पुन्हा अतिक्रमण केल्याचेे आढळले तर संबंधितांवर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.