श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेली आग आणि त्यातून निर्माण होणारा विषारी धूर हा नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत सन 2022 ते 2025 या कालावधीत प्रशासकीय कारभार सुरू असताना, विविध विकासकामांचे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. या काळात करण्यात आलेल्या काही कामांबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा होत असतानाच, सन 2024 मध्ये सुमारे 58 लाख रुपये खर्चून नवीन अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आले. एम.एच. 17 सी.व्ही. 3381 क्रमांकाच्या या वाहनाची पाणी साठवण क्षमता सुमारे दोन हजार लिटर असल्याचे सांगितले जाते.
मात्र, संबंधित वाहनाबाबत सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी असल्याचा आरोप होत आहे. वाहनाला वारंवार कोड पडत असल्याने त्याचा वेग मर्यादित होतो, आणि वाहन तांत्रिकदृष्ट्या निकामी होते. अशा वेळी ते दुरुस्तीसाठी शोरूममध्ये न्यावे लागत असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या कचरा डेपोला गेल्या महिनाभरापासून आग लागलेली असून, ती पूर्णपणे विझविण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. या आगीतून निघणारा धूर शहरासह परिसरात पसरत असल्याने नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन वाहन कचरा डेपो परिसरात उभे असले तरी आग नियंत्रणासाठी त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचे दिसून येते. परिणामी आग विझविण्यासाठी दोन ट्रॅक्टर टँकरांच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. याचा परिणाम शहरातील इतर नागरी सेवांवरही होत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता वाढलेली असताना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर कचरा डेपोवरील आगीसाठी होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याची तक्रार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी गटारे व चेंबर साफसफाईची कामे, चोकअप काढण्यासाठी आवश्यक पाण्याचा वापर आणि स्वच्छता मोहीम यांनाही विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अग्निशमन वाहन खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित विभागांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. श्रीरामपूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची आणि मोठ्या लोकसंख्येची नगरपालिका मानली जाते.
शहरात व्यापारी संकुले, रुग्णालये, गोदामे, मॉल्स आणि दाट लोकवस्तीची क्षेत्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा परिस्थितीत सक्षम आणि तत्पर अग्निशमन व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे. नागरिकांकडून अग्निशमन कर आकारला जात असताना त्यांना प्रभावी सेवा मिळणेही तितकेच आवश्यक आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची सध्याची स्थिती, कचरा डेपोवरील आग आणि त्यातून निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
– कचरा डेपोवरील आग तातडीने पूर्णपणे विझवावी.
– विषारी धुरामुळे होणार्या आरोग्य परिणामांचे सर्वेक्षण करावे.
– अग्निशमन वाहनातील तांत्रिक बिघाडाची स्वतंत्र चौकशी करावी.
– वाहन खरेदी प्रक्रियेतील कथित अनियमिततेची निःपक्ष चौकशी करावी.
– शहरासाठी सक्षम व आधुनिक अग्निशमन वाहन उपलब्ध करून द्यावे.
– पाणीपुरवठा आणि स्वच्छता कामांवर होणारा परिणाम दूर करावा.
– नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन अग्निशमन यंत्रणाबळकट करावी.




