
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील सुमारे चार हजार एकर बागायत जमीन झेडआरटू ग्रुप होल्डिंग कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. ही जमीन खुल्या लिलावात विकली तर राज्य सरकारला हजारो कोटी रूपये मिळतील. मात्र, सहा हजार कोटींची ही जमीन एका मंत्र्याच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा खळबळजनक काँग्रेसच्या विजय वडेट्टीवर यांनी बुधवारी विधानसभेत केला. शेती महामंडळाची ही जमीन शेल कंपनीला देऊ नका. राज्य सरकारला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आले तर ती जमीन लिलावात विका, असा सल्लाही त्यांनी दिला.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची चार हजार एकर जमीन झेडआरटू या कंपनीच्या प्रकल्पाला 49 वर्षाच्या भाडेकराराने देण्याबाबत झालेल्या निर्णयाच्या संदर्भात काँग्रेसच्या हेमंत ओगले यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सहभागी होताना वडेट्टीवार यांनी सरकारवर जमीन विक्रीचा घाट घातल्याचा आरोप केला. ज्या कंपनीच्या कामकाजात आणि आर्थिक व्यवहारांत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा कंपनीच्या घशात जमीन घातली जात असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, झेडआरटू ग्रुप होल्डिंग आणि झेडआरटू बायोएनर्जी या कंपन्यांमध्ये जिमी ओल्सन आणि सुनील कलापुरे हे संचालक आहेत. हे दोघेही महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या संबंधित संस्थांमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या जमिनीच्या हस्तांतरणात राजकीय हितसंबंध गुंतले आहेत.
या कंपनीच्या ताळेबंदात मोठी विसंगती आहे. 2024 मध्ये अवघ्या दीड कोटींच्या आसपास विक्री दाखवणारी ही कंपनी कुठलाही ठोस व्यवसाय नसताना 30 कोटींचा नफा दाखवते. तसेच 2025 मध्ये अचानक 100 कोटींची भांडवली वाढ दाखवणे हा आर्थिक गैरव्यवहार आहे. ही जमीन शेतकर्यांच्या हक्काची असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत बोगस कंपनीला देऊ नये. हा खूप मोठा घोटाळा आहे. ही जमीन एमआयडीसीच्या मार्फत या कंपनीला देण्याचा डाव आहे. त्यासाठी उद्योग विभागाने शासन निर्णय सुद्धा बदलण्यात आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
या जमिनी बाबतचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये
दरम्यान, या लक्षवेधी सुचेनावरील चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमिनीच्या बाबतचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये होईल, असे सांगितले. तसेच ही जमीन चुकीचे पद्धतीने विकण्यात येणार नाही, असे सांगत बावनकुळे यांनी या प्रकरणी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
अकारी पडीत जमिनी शेतकर्यांना मिळाव्यात हीच माझी भूमिका – ना. विखे
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून, त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी दुरान्वये माझा संबंध नाही.उलट अकारी पडीत जमीन मूळ मालकांना परत मिळाव्यात हीच आपली भूमिका आहे.तसे पत्रही महसूल मंत्र्यांना दिले आहे. परंतू अपूर्ण माहीतीवर केलेल्या आरोपाबाबत वडेट्टीवार यांनी माफी मागितली पाहीजे अन्यथा मलाही कायदेशीर मार्ग अवलंवावा लागणार असल्याची प्रतिक्रिया जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.




