श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणीची बिले तयार केली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात करात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परंतु नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या सर्व करांमध्ये विशेष शिक्षण कर व अग्निशामन कर पूर्णपणे माफ करण्यात येणार असून यामुळे नगरपालिकेचे एक कोटी तीस लाख रुपयाचे उत्पन्न कमी होणार असले तरी शहरातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय आपण घेतला आहे. अशी घोषणा नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली.
शहरात नगर परिषदेद्वारे सुरू असलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी बाबत निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष कांचन सानप व मुख्याधिकारी मनोज उर्किडे व्यासपीठावर उपस्थित होते. शहरातील मालमत्ता धारकांना चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण 32 हजार 948 मालमत्तांची कर आकारणी करण्यात आली. त्यापैकी 7507 लोकांनी हरकती नोंदवल्या आहेत. सदर कर आकारणी करण्याचा ठेका अमरावतीच्या एका संस्थेला तत्कालीन पालिका प्रशासनाने दिला होता. त्यासाठी दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च झाली आहे. 2022 साली ही वर्कऑर्डर देण्यात आली. त्याचे काम यावर्षी पूर्ण झाले.
सन 2014 ते 15 साली शेवटची कर आकारणी करण्यात आली होती.त्यामुळे बारा वर्षांपूर्वी कर आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर आता ही कर आकारणी होत आहे. असे असले तरी मागील वर्षांची कर आकारणी न करता नवीन कर आकारणी ही सन 26 ते 27 पासून केली जाणार असल्याचे ही ससाने यांनी जाहीर केले. शहरातील नागरिकांकडून अन्यायकारक पद्धतीने एक रुपयाही आम्हाला नको आहे. त्याचबरोबर पालिकेचे उत्पन्नात वाढ ही झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2023 नंतर शहरात जी नवीन बांधकामे झालेली आहेत. त्यांचा समावेश या कर आकारणीत नसल्याने नवीन बांधकामाचा सुद्धा सर्वे करून त्यांना ही घरपट्टीची आकारणी केली जाईल. त्यातून काही उत्पन्न वाढेल.
सर्व मालमत्ता धारकांना दोन वेळा नोटीसा मिळणार असून दोन्ही वेळी त्यांना आपले म्हणणे मांडता येणार आहे. अमरावतीच्या कंपनीने ज्या ठिकाणी चुकीची मोजमापे केली असतील ती दुरुस्त करण्यात येतील. तसेच कमर्शियल आकारणी करताना चुकीच्या पद्धतीने जर आकारणी केली असेल तर त्यातही बदल करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. शहरातील सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना कोणतीही कर आकारणी केली जाणार नाही. मात्र त्याचा व्यावसायिक वापर कुठेही केला जाता कामा नये असे ही त्यांनी सांगितले. दरम्यान या विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात ससाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेमध्ये अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल सल्लागार यांना निधी अदा करणे, एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणे कामी येणारे खर्चास मंजुरी देणे, श्रीरामपूर नगर परिषदेकडील अग्निशामन ट्रॅक्टर, स्वर्ग रथ, टँकर, ट्रेलर इत्यादी जुनी वाहने निर्लेखित करणे बाबत विचारविनिमय करणे, नगरपरिषदेच्या मालकीच्या नसलेल्या आरक्षित जागा एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम तरतुदीनुसार समावेशक आरक्षण विकसित करणे, श्रीरामपूर नगर रचना योजना क्रमांक पाच लवाद नगर रचना कार्यालयाकडे सुधारित तरतुदीचे अनुषंगाने प्रगतीपथावर असलेल्या नगररचना योजनांच्या वैद्यतेबाबत टिपणीवर विचार करणे, श्रीरामपूर नगर परिषद हद्दीमध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, कचरा डेपो येथे आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, गोंधवणी येथील शाळा क्रमांक पाचची जीर्ण झालेली इमारत निष्कासित करणे, बाजार तळ जवळील मटन मार्केट येथे भाजी मंडई विकसित करणे, सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षात हाती घ्यावयाच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देणे व श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामासाठी बोलवलेल्या निविदांचा विचार करणे इत्यादी विषयावर साधक-बाधक चर्चा झाली. या चर्चेमध्ये नगरसेवक श्रीनिवास बिहानी, अंजूम शेख, आशिष धनवटे, दीपक चव्हाण, श्याम आढागळे, गटनेते मुजफ्फर शेख, स्नेहल खोरे, वैशाली चव्हाण, जितेंद्र छाजेड, दिलीप नागरे, संजय गांगड, राजेंद्र पवार यांच्यासह महिला नगरसेविकांनी भाग घेतला.




