Saturday, April 4, 2026
HomeनगरAccident News : श्रीरामपुर-संगमनेर रस्त्यावर कार व ट्रकचा भीषण अपघात

Accident News : श्रीरामपुर-संगमनेर रस्त्यावर कार व ट्रकचा भीषण अपघात

चार जणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूरहून खंडाळाच्या दिशेने गणपती दर्शनासाठी जात असणार्‍या शहरातील चव्हाण कुटुंबीयांच्या कारची समोरून येत असलेल्या ट्रकला धडक बसली. या अपघातात तिघांचा जागीच, तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी आहेत. त्यात दोन लहान मुले गंभीर जखमी आहेत. दुपारी सव्वाचारच्या सुमारास खंडाळा परिसरात संगमनेर-श्रीरामपूर रस्त्यावर हा अपघात झाला. चव्हाण कुटुंब हे श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या संतोषी वडापावचे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय आहे.

- Advertisement -

या भीषण झालेल्या अपघातात प्रशांत रमेश चव्हाण (वय 24), संगीता अनिल चव्हाण (वय 40), सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय 16), ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय 26) हे चार जण मयत झाले असून, सारिका अनिल चव्हाण (वय 30), रुद्र अशोक चव्हाण (वय 6, गंभीर जखमी), ऋत्वी अशोक चव्हाण (वय-साडेतीन वर्षे, गंभीर जखमी) हे तीन गंभीर जखमी असून त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरु आहेत.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 7 मध्ये राहणारे चव्हाण कुटुंबिय आपल्या स्विप्ट कार (नं. एमएच 03 एएफ 0054) मधून गणपतीच्या दर्शनासाठी श्रीरामपुरहून खंडाळा गावाकडे जात होते. संगमनेर रोडवरील एसटी कार्यशाळेजवळ खंडाळा परिसरात समोरुन येणार्‍या ट्रक नं. (एचआर 67 ई 3002) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, काही क्षणातच परिसरतील अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये कारच्या दर्शनी भागाचा अगदी चक्काचूर झाला होता.

या अपघातातील जखमींना घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने शहरातील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले, या ठिकाणी तिघांना मयत घोषित करण्यात आले. अन्य जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. या ठिकाणी सिद्धार्थ चव्हाण, प्रशांत चव्हाण, संगीता चव्हाण व एश्वर्या चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ऋत्वी आणि रुद्र ही लहान मुले मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. गर्दीला पांगवून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. शहर पोलिसांनी व कोपरगाव प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी वाहनांचा पंचनामा केला. अपघात घडल्यानंतर संगमनेर-श्रीरामपूर रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशांत चव्हाण यांनी दहा दिवसांपूर्वीच ही कार खरेदी केल्याची यावेळी चर्चा होती.

श्रीरामपूर येथील प्रसिद्ध संतोषी वडापावचे संचालक चव्हाण यांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला असून, भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गणपती दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला असून, यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. विशेष म्हणजे प्रशांत चव्हाण यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वीच ही कार खरेदी केली होती, अशी चर्चा घटनास्थळी होती.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या...

0
मुंबई | Mumbai नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबातील ९ जणांचा 'इर्टिका' कारने घराकडे परतत असताना दिंडोरी शहरातील...