अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ओळखीच्या तरूणासोबत पुणे येथे जाण्यासाठी निघालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील युवतीवर त्या तरूणाने चास (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी (26 जानेवारी) घडला. दरम्यान, पीडित युवतीवर अत्याचार करण्यापूर्वी त्या तरुणाने तिला गुंगीचे औषध पाजले असल्याचे समोर आले आहे.
पीडित युवतीने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अहमद हसन सय्यद (रा. न्यु इंग्लिश स्कुल मागे, खंडाळा, ता. श्रीरामपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने गुन्हा तपासकामी नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी युवती पुण्यातील एका बँकेत नोकरी करत असून, आपल्या मावस भावाच्या लग्नानिमित्त ती श्रीरामपूर येथे आली होती.
परत पुण्याला जात असताना तिच्या ओळखीच्या अहमद सय्यद याने तिला त्याच्या वाहनातून पुणे येथे जावू असे सांगितले. ते दोघे पुणे येथे जाण्यासाठी रविवारी निघाले. प्रवासादरम्यान युवतीला त्रास होत असल्याने, वाहन थांबवून लॉजवर जाण्यास त्याने तिला भाग पाडले. लॉजवर पाणी पिल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, पीडितेने तिच्या वडिलांना फोन करून घडलेली घटना सांगितली, त्यानंतर तिच्या नातेवाईकांसह कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी गुन्हा नगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.