Thursday, March 13, 2025
Homeनगरउगमस्थानापासूनच प्रदुषणाचा विळखा !

उगमस्थानापासूनच प्रदुषणाचा विळखा !

सीना नदीची जेऊर परिसरातील स्थिती

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

ससेवाडी गावातील सीनाशंकर या पवित्र तीर्थस्थळावरून उगम पावणार्‍या सीना नदीची जेऊर परिसरात दुरवस्था झाली आहे. नदीपात्र नावालाच राहिले असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य व अतिक्रमणाचा विळखा पात्राला पडलेला दिसून येत आहे. सीना नदी पात्राच्या सुशोभीकरणाची गरज असल्याची मागणी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जेऊर परिसरातील ससेवाडीच्या डोंगररांगांमध्ये सीना नदीचा उगम होतो. पुढे तीन किलोमीटर अंतरावर जेऊर गावामधून सीना नदी पिंपळगाव तलावास जाऊन मिळते. पिंपळगाव तलावातून वडगाव गुप्ता- नगर असा प्रवास करत नदीचे पात्र विस्तारत गेले आहे. परंतु उगमस्थानी सीना नदीपात्राच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.सीना नदीचे पाणी पिंपळगाव तलावात जाते. पिंपळगाव तलावातून जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव, डोंगरगण, मांजरसुंभा गड या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु नदीपात्रातील घाणीमुळे पाणी दूषित होत आहे. त्याचा परिणाम तलावातील माशांवरही होतो. तसेच तलावातून पाणीपुरवठा होणार्‍या गावातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवत आहे.

- Advertisement -

नगर येथे सीना नदीपात्राच्या सुशोभीकरणासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून मोठे प्रयत्न करण्यात येत असल्याचे पहावयास मिळते. परंतु याच सीना नदीची उगमस्थानी झालेली दुरवस्था पाहता सीना नदी सुशोभीकरणासाठी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जेऊर येथील आठवडे बाजारदेखील सीना नदीपात्रात भरत असून, परिसरात संपूर्णतः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जेऊर गाव सीना नदीपात्राच्या तीरावर वसले आहे. गावची मुख्य बाजारपेठ पात्रातील अतिक्रमणातच वसलेली आहे. गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता देखील सीनामाईच्या तीरावर असणार्‍या कडीवर विराजमान आहे. अशा या सीना नदीपात्राचा शुध्दीकरणाची गरज निर्माण झाली आहे.

नदी शेजारी शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न
सद्यःस्थितीला सीना नदीचा कचरा डेपो म्हणूनच वापर होत आहे. गावचे सांडपाणी व येथे मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणारा कचरा यामुळे नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सीना नदीच्या तीरावर रयत शिक्षण संस्थेचे श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय असून, या विद्यालयात सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नदीपात्रातील घाणीच्या साम्राज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. सीना नदीपात्राच्या सुशोभीकरणासाठी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...