नाशिक | प्रतिनिधी
सिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०२ वाजता रामकुंड (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुलभ वाहतुकीसाठी आणि सुरक्षेसाठी शहरातील सहा प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. खालील मार्गांवर सर्व प्रकारची वाहतूक टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पोलीस व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोहळ्याची मुख्य वैशिष्ट्ये
दिनांक व वेळ : ३१ ऑक्टोबर २०२६, दुपारी १२:०२ वाजता.
मुख्य ठिकाणेः रामकुंड (रामतिर्थ) आणि कुशावर्त तिर्थ, त्र्यंबकेश्वर.
भाविकांसाठी वाहनतळे, स्वतंत्र मार्ग
बाहेरगावाहून व शहरातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि ५ ते ३ स्वतंत्र मार्ग आखण्यात आले आहेत.
गंगापूर रोडने येणाऱ्यांसाठी सिद्धेश्वर मंदिर मार्गे येऊन संभाजी महाराज उद्यान येथे वाहने पार्क करावीत आणि तेथून अहिल्यादेवी होळकर पुल व एकमुखी दत्त घाट मार्गे रामतीर्थावर पायी पोहोचावे.
अशोक स्तंभ मार्गाने येणाऱ्यांना रविवार कारंजा येथील पार्किंगमध्ये वाहने उभी करून सराफ बाजार, सरकारवाडा पोलीस चौकी, भांडी बाजार, बालाजी कोट आणि नीलकंठेश्वर घाट मार्गे रामतीर्थ गाठावे.
तपोवन, मुंबई-आग्रा महामार्ग व गणेशावाडी भागातून येणाऱ्यांनी पंचवटी तपोवन, बी. डी. भालेकर मैदान, तसेच तपोवन क्रॉसिंग, स्वामी नारायण मंदिर, शिंदे मळा किंवा श्रद्धा लॉन्स याठिकाणी वाहने पार्क करून गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण मार्गे जुने भाजी पट्टांगण येथे पायी पोहोचावे.
६ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद
रविवार कारंजा ते होळकर पूल, मालेगाव स्टँड आणि पंचवटी कारंजा मार्गे दिंडोरी नाक्याकडे जाणारा मार्ग.
मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टँड आणि रामतीर्थ मार्गे सरदार चौकाकडे जाणारा मार्ग.
रामतीर्थाकडून मालवीय चौक मार्गे पंचवटी कारंजाकडे जाणारा मार्ग.
शनी चौक ते रामतीर्थ मार्ग.
गाडगे महाराज पूल.
रामसेतू पूल.




