सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
कर्तव्यात कसूर करणार्या कोणत्याही अधिकार्यांना पाठीशी घातले जाणार नाही. काळाबाजार करणार्या दुकानदार व त्यांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यास मागे-पूढे पाहणार नाही असा इशारा कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिला.
खते लिंकिंग संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांकडून तक्रारी येत होत्या. त्यापार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या सर्व अधिकार्यांची एक बैठक ना. कोकाटे यांच्या सोमठाणे येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. जिल्ह्यात खतांचा स्टॉक किती आहे याची माहिती त्यांनी अधिकार्यांकडून घेतली. जास्त मागणी खत कंपनीशी लिंक करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या.
शेतकर्यांना 260 रुपयाची युरिया गोणी घ्यायची असल्यास त्यासोबत पाचशे रुपयांची सक्ती का? न मागताही तुम्ही शेतकर्यांना सक्ती कशी करू शकता का असा प्रश्नही त्यांनी केला. दोन दिवसात यावर अंमलबजावणी करा. यापुढे लिंकिंग चालणार नाही. को-ऑपरेटिव संस्थां, खरेदी विक्री संघ यांना माल द्या. कंपन्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली लिंकिंग करत असतात असे अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले.
शेतीच्या पिकांना मनासारखा भाव नसतांना शेतकर्यांना खतं खरेदी करण्यासाठीची सक्ती चुकीची आहे. त्यासोबत बाहेर मार्केटमध्ये सदर खते स्वस्त दिली जातात तर लिंकिंग केल्यावर ती महाग विकली जातात याकडे ना. कोकाटे यांनी लक्ष वेधले. बियाणे, खतांवर जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून शेती अवजारांच्या खरेदीवरील 18% जीएसटी कमी करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. एक जानेवारीपासून खतांच्या किंमती वाढणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोणाकडे किती साठा आहे, त्याचे रजिस्टर व्हेरिफाय करा अशी सूचना त्यांनी दिली.
दुकानदारांकडे किती माल आला, किती विकला गेला व किती शिल्लक याचीही तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली. शेतकर्यांना खते मिळत नसतील तर त्यांच्यासाठी तक्रार नंबर सुरू करा असे आदेश त्यांनी दिले. जूना खतांचा साठा जून्याच किंमतीत विकला गेला पाहिजे याची काळजी घ्या. अधिकार्यांनी कामात कसूर केली तर त्यांच्यावर कारवाई करणार, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
खते व लिंकींगसंदर्भात शेतकर्यांच्या काही अडचणी असल्यास अथवा तक्रारी असल्यास शेतकरी खालील नंबरवर संपर्क साधू शकतात. तक्रार निवारण कक्ष, नाशिक-7821032408, मोहिम अधिकारी दिपक सूर्यवंशी – 9975434418, जिल्हा गुणवंत नियंंत्रण निरिक्षक – डॉ. सूर्यवंशी 8208353495, कृषी विकास अधिकारी, नाशिक- संजय शेवाळे 8329739783